आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Speech On The Behalf Of Balasaheb Thackeray First Death Anniversary

वयोवृद्धांनी पुढच्या पिढीकडे हिंदुत्व सोपवावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सृष्टीतली प्रत्येक वस्तू पूजनीय आहे. मग ती सजीव असो किंवा निर्जीव, ज्याप्रमाणे नद्या सागराला मिळतात. त्याचप्रमाणे सर्व धर्म हिंदू धर्मात मिसळतात. त्यालाच सनातन धर्म म्हटले जाते. वयोवृद्ध झालेल्या व्यक्तींनी पुढच्या पिढीकडे हिंदुत्व सोपवणे आवश्यक आहे. आज प्रत्येक हिंदूने धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार गोष्टी पुढच्या पिढीकडे प्रदान करण्याची आवश्यकता असल्याचे मत पंडित विजय शंकर मेहता यांनी व्यक्त केले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेतर्फे गंधे सभागृहात आयोजित केलेल्या व्याख्यानात ‘हिंदुत्व’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी महापौर राखी सोनवणे, सुरेश भोळे, अतुल हाडा, डॉ. अश्विन सोनवणे, पांडुरंग काळे, गजानन मालपुरे, सचिन नारळे उपस्थित होते.

ते म्हणाले, की धर्माचाच दुसरा अर्थ शिक्षण होतो. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपल्या मुलांना निपुण केले पाहिजे. परंतु ते शिक्षण संस्कारयुक्त असावे. संस्कार देण्याचे काम आईचं आहे, तर विचार वडिलांनी देणे आवश्यक आहे. अर्थ म्हणजे धन, पैसा; पण आपले सर्वात मोठे धन परिवार आहे. लग्न परिवाराचं मुख्य केंद्र आहे. म्हणून सोळा संस्कारातील एक लग्न आहे.

निष्ठेने काम केल्यास मोक्ष
काम म्हणजे परिश्रम, पुरुषार्थ आणि आता कामाचा अर्थ व्यवस्थापन झाला आहे. पुरुषार्थाला पराक्रमासह मॅनेजमेंटला जोडणे म्हणजे काम. हिंदू धर्म दुसर्‍याचे हित जपणे शिकवतो. त्यामुळे हिंदू धर्माबरोबर मॅनेजमेंट शिकले पाहिजे. तर मोक्षाचा अर्थ बोध, जनजागृती आहे. आपले काम निष्ठेने केल्यावर आपोआप मोक्ष मिळतो. भजन-पूजन करून मोक्ष मिळत नाही. तर स्वत:ची ओळख पटल्यानंतरच मोक्ष मिळतो, असे पंडित मेहता यांनी सांगितले.

प्रत्येक व्यक्ती वैफल्यग्रस्त
आज प्रत्येक व्यक्ती सामाजिक, खासगी, पारिवारिक जीवनात वैफल्यग्रस्त झाली आहे. त्या मानसिकतेत आपण जगतो हे विरोधाभासी आहे. सुखाबरोबर शांती यश व प्रसन्नता मिळवता आली पाहिजे. पण 90 टक्के लोक त्यापासून दूर जात आहेत. दुसर्‍यांना भ्रष्टाचार करताना पाहून आपण त्याला परावृत्त करत नाही, तर आपला नंबर तेथे कधी येईल, याची वाट आता आपण बघतो; असेही मेहता या वेळी म्हणाले.

भाजपतर्फे श्रद्धांजली
बाळासाहेब ठाकरेंच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे रविवारी जिल्हा कार्यालयात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच पांडुरंग काळे, सत्यनारायण व्यास, सुरेश भोळे, दीपक फालक, अमित भाटिया, संजय भोळे, डॉ.आश्विन सोनवणे, वैशाली पाटील, शब्बीर सय्यद, अतुलसिंह हाडा यांच्यासह कार्यक र्त्यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.