आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धूळे शहरातील गतिरोधक चुकीचेच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - वर्दळ असलेल्या महत्त्वाच्या रस्त्यांवर गतिरोधक उभारताना ते नियमानुकूल असावेत. मात्र, शहरात गल्लीबोळांसह रस्त्यांवर निर्माण केलेले गतिरोधक चुकीचे आहेत, अशी माहिती तज्ज्ञ अभियंता हिरालाल ओसवाल यांनी दिली. त्यामुळे वाहनधारकांचे नुकसान होते. त्याचबरोबर अपघात वाढले आहेत. यंत्रणा चुकीचे काम करीत असतानाही त्यावर कोणाचे नियंत्रण नसते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

महापालिकांच्या कामाचा दांडगा अनुभव असलेल्या हिरालाल ओसवाल यांनी यापूर्वी ठाणे तसेच कल्याण महापालिकेत नियमानुकूल कामे कशी होतात, याचा आदर्श घालून दिला आहे. शहरातही तशीच कामे व्हावी, या अपेक्षेने त्यांनी सध्या मनपाला मार्गदर्शन करायला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या त्रिसदस्यीय समितीत त्यांचा सहभाग आहे. शहरातील रस्त्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करताना त्यांनी गतिरोधकांबाबत महत्त्वाची माहिती दिली. मुळात कुठल्याही रस्त्यावर गतिरोधक टाकता येत नाही. महापालिकेला त्यासाठी त्या रस्त्यावरून होणा-या वर्दळीचा अभ्यास करावा लागतो. मात्र, धुळे महापालिकेत अभ्यासाची कमतरता आहे. त्यामुळे अगदी कॉलनी परिसरातही एकेका रस्त्यावर पाचपेक्षा जास्त गतिरोधक टाकले गेले आहेत.
त्यावरून वाहने आदळतात. त्यांची उंची जमिनीशी समांतर असायला हवी. मात्र, तशी त्यांची उंची नसते. जास्त उंचीमुळे वाहन इतक्या जोरात आदळते की, त्यावरील स्वाराला इजा होऊ शकते. लोकांच्या हितासाठी असलेले गतिरोधक त्यांना अपायकारक ठरताना दिसतात, असेही त्यांनी सांगितले.

देवपूरमध्ये गतिरोधकांचा कहर
देवपूर परिसरातील कॉलनी भागात गतिरोधक टाकण्याचा कहर झालेला आहे. ठेकेदारांनी रस्ते तयार करताना शंभर पावलांवर एक असे गतिरोधक टाकलेले आहेत. जयहिंद सीनिअरपासून ते ज्युनिअरपर्यंत गतिरोधकांचा जितका कहर झाला आहे, तितकाच याच परिसरातील
कॉलन्यांमध्ये झालेला आहे.

खडी व डांबरमिश्रित उंचवटे जमिनीशी समांतर करण्याची गरज
गतिरोधक कसे असावेत याचे सरकारच्या रस्ता विभागाने काही नियम केले आहेत. अगदी महामार्ग असला तरी जमिनीपासून 10 सेंटिमीटरपेक्षा जास्त उंची गतिरोधकाची असायला नको. तसेच गतिरोधकाच्या डाव्या आणि उजव्या बाजू तर 1.20 सेंमीपेक्षा जास्त उंची असायला नको. मात्र, शहरात त्यापेक्षा जास्त उंचीचे गतिरोधक टाकले गेले आहेत. त्यावरून जाताना वाहने आदळतात.

गती रोखण्यापेक्षा अपघाताची भीती
० जयहिंद सीनिअर महाविद्यालयाजवळ एकाच ठिकाणी तीन गतिरोधकांमुळे अडते रस्त्यावरील वाहतूक.
० मयूर कॉलनीत वर्दळ नसतानाही अर्धा किलोमीटरच्या रस्त्यावर तब्बल पाच गतिरोधकांमुळे नागरिकांना होतो त्रास.
० सिद्धिविनायक गणपती मंदिरासमोरील देवपूरकडील रस्त्यावर तब्बल सहा ठिकाणी असलेल्या उंचवट्यांमुळे वाहने खराब.
० देवपूर बसस्थानकाच्या अलीकडे व पलीकडे असलेल्या गतिरोधकांच्या जास्त उंचीमुळे वाहने आदळून होतात अपघात.
० दिवसभर वर्दळ असलेल्या आग्रारोडवर एकही गतिरोधक नसल्यामुळे रात्रीच्या सुमारास वाहने धावतात सुसाट वेगाने.
० बारापत्थर तसेच मॉडेलरोडवरही गतिरोधकांची कमतरता असल्याने खड्डेच करतात गती कमी व वाढवितात अपघात.
० ऐंशीफुटी रस्त्यावर केवळ कनोसा शाळेनजीक एकाच बाजूने एकाच ठिकाणी तब्बल सहा उंचवट्यांमुळे वाढलाय त्रास.

रबरी गतिरोधक ठरतील पाया
शहरात खडी आणि डांबरमिश्रित गतिरोधक वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहेत. यावर उपाय म्हणून रबराच्या गतिरोधकांचा पर्याय पुढे येत आहे. पुण्यासारख्या शहरात रबराच्या गतिरोधकांचा वापर वाढला आहे. हे गतिरोधक सुरक्षित समजले जात असल्याचे दिसून येत आहेत.

शहरात महापालिकेच्या हद्दीत जिथेही गतिरोधक टाकले गेले. ते अधिक उंचवट्यामुळे वादात सापडले आहेत. त्यामुळे शहरात काही ठिकाणी हे गतिरोधक उखडून टाकण्याची कारवाईदेखील झाली आहे. काही ठिकाणी तर नागरिकांनीच हे गतिरोधक कमी करून घेतले आहेत. मात्र, जिथे जास्त वर्दळ असते त्या ठिकाणी असलेल्या गतिरोधकांबाबत केवळ ओरड होते. यावर उपाय म्हणून रबराच्या गतिरोधकांचा पर्याय पुढे आला आहे. महापालिकेने या पर्यायाची अद्याप चाचपणी केलेली नाही. मात्र, भविष्यात रबराचे गतिरोधक शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. रबराच्या गतिरोधकांचे डिझाइनच मुळात वाहनाचा वेग कमी करणे आणि त्यातून होणारे अपघात कमी होतील, असे तयार करण्यात आलेले असते. महामार्गासह रहिवासी भागातील रस्ता सुरक्षितेसाठी रबराचे गतिरोधक महत्त्वाचे ठरत आहेत. वाहनामुळे गतिरोधकावरील रबरावर दाब पडतो. त्यातून ते खाली जाते. परिणामी वाहनाला दणका बसत नाही. ते आदळत नाही. पाठीच्या मणक्यांना त्रास होत नाही. वेग कमी करण्यासाठी जास्त ब्रेक लावण्याची गरज पडत नाही.