आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल अभयारण्यात पट्टेदार वाघ, दोन दशकांनंतर वाघांचे अस्तित्व जाणवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल अभयारण्यात शिकारीचा फडशा पाडताना ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालेला वाघ.
भुसावळ - यावल अभयारण्यात पट्टेदार वाघांचा अधिवास असल्याचे स्पष्ट पुरावे तब्बल २० वर्षांनंतर रविवारी (दि.३) रात्री हाती लागले. अभयारण्यात नव्यानेच कात टाकलेल्या भागात सुमारे साडेचार वर्षांच्या एका रुबाबदार नर पट्टेदार वाघाची छबी उच्च क्षमतेच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्याने नववर्षाच्या सुरुवातीलाच अभयारण्याचा पुनर्जन्म झाल्याची प्रतिक्रिया वन्यजीव विभागासह पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.

१७५.५८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या यावल अभयारण्याची वन आणि वन्यजीव संपदा कधीकाळी जगभरात दखलपात्र होती. मात्र, गेल्या ३० वर्षांपासून सातत्याने होणारे अतिक्रमण, वृक्षतोड, वनहक्क कायद्याच्या दुरुपयोगामुळे पट्टेदार वाघ, दुर्मिळ वन्यजीवांच्या अधिवासावर संक्रांत आली. जिल्ह्यातील पर्यावरण चळवळीत कार्यरत असलेल्या अनेकांनी यावल अभयारण्यातील जैवविविधता टिकून राहावी, यासाठी शक्य ते प्रयत्न केले. शिवाय अभयारण्यात पट्टेदार वाघ अजूनही टिकून असल्याचा दावा वेगवेगळ्या व्यासपीठांवर केला, असे असले तरी ऐकीव माहितीच्या पलीकडे पुरावे उपलब्ध झाले नाहीत.

मात्र, सुदैवाने गेल्या पाच वर्षांपासून वन्यजीव आणि प्रादेशिक वनविभागाने केलेले प्रामाणिक प्रयत्न यावल अभयारण्यात अजूनही जंगलाचा राजा रुबाबात वावरत असल्यावर शिक्कामोर्तब करून गेले. शिवाय अभयाण्यातील अतिक्रमण काढून, आहे ते जंगल वाचवणे आणि कुरण विकासाचे झालेले प्रयत्न तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढवण्यास पूरक ठरले.

शिकार उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढताच अभयारण्यात डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून पट्टेदार वाघाचे पगमार्ग आढळणे सुरू झाले होते. यामुळे वन्यजीव विभागाने १८ ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले. यापैकी जानेवारीला रात्री ७.३० वाजेनंतर एका उच्च शक्तीच्या कॅमेऱ्यात रुबाबदार वाघाची छबी शिकारीचा फडशा पाडताना कैद झाली. तब्बल २० वर्षांनंतर यावल अभयारण्यात वाघाचे अस्तित्व ठळकपणे समोर आल्याने वन्यजीव विभाग आणि पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला. यापुढे अभयारण्यात वाघाच्या संवर्धनासाठी वनविभाग पर्यावरण प्रेमींकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

अभयारण्यासाठी वैभव
यावल अभयारण्यात पट्टेदार वाघ दिसणे म्हणजेच मेळघाट ते अनेर डॅम या नैसर्गिक टायगर कॉरिडॉरवर शिक्कामोर्तब होणे आहे. या कॉरिडॉरसाठी गेल्या १० वर्षांपासून आम्ही प्रयत्नशील आहोत. विनाशाच्या मार्गावर असलेल्या अभयारण्यासाठी वाघ मोठेच वैभव आहे. राजेंद्रनन्नवरे, निमंत्रक, सातपुडा बचाव कृती समिती, जळगाव

अभिमान वाटतो
पट्टेदारवाघाचे अस्तित्व सिद्ध झाल्याने यावल अभयारण्याला पूर्वीची श्रीमंती मिळवून देण्यासाठी सुरू केलेल्या आमच्या प्रयत्नांना हत्तीचे बळ मिळाले आहे. अभयारण्यात जीवाची बाजी लावून मेहनत घेणाऱ्या आमच्या सर्व सहकाऱ्यांचा अभिमान वाटतो. यापुढेही असेच प्रयत्न होतील. एस.व्ही. रामाराव, मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नाशिक