आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण - सर्वशिक्षा अभियानांतर्गत एक लाखावर विद्यार्थ्यांना होणार योजनेचा लाभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वशिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यात शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, अपंग विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करणे, विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करणे, मोफत पुस्तकांचे वाटप करण्यासह मोफत गणवेश वितरण योजनेचा समावेश आहे. त्यानुसार पहिली ते आठवीच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीचे मुले तसेच दारिद्रय़रेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश देण्यात येतो.
यंदा शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नव्हते. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने 20 जूनच्या अंकात ‘विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेशाची प्रतीक्षा’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत दोन गणवेशांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला 400 रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाने दोन कोटी 77 लाख 50 हजार 800 रुपये मंजूर केले आहेत. या योजनेंतर्गत 69 हजार 377 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होणार आहेत. राज्य शासनाच्या गणवेश योजनेतून दरवर्षी प्रत्येक मुलास 57 व मुलींना 69 रुपये गणवेशासाठी देण्यात येतात. या योजनेतील लाभार्थ्यांसाठी सर्वशिक्षा अभियानांतर्गत वाढीव तरतूद मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार मुलांसाठी 343 व मुलींसाठी 331 रुपये प्रति गणवेश याप्रमाणे एक कोटी 24 लाख 1 हजार 348 रुपये मंजूर झाले आहेत. या योजनेंतर्गत 36 हजार 752 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 1 लाख 6 हजार 129 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. लवकरच विद्यार्थ्यांंना गणवेशाचे वाटप करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कापड घेण्याचे अधिकार शाळांना - सर्वशिक्षा अभियानाकडून मिळालेला निधी गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत प्रत्येक शाळेला वर्ग करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार या वर्षी शाळांनाच कापड खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यासाठी शाळांना तीन ठेकेदारांच्या निविदा मागवाव्या लागणार आहेत. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीला गणवेशाचा रंग, दर्जा ठरवून गणवेश वितरण करावे लागणार आहेत. त्याचबरोबर कापड खरेदीनंतर उर्वरित रक्कम लगेचच जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना त्वरित गणवेश मिळावेत, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, शिक्षणाधिकारी के.के. वळवी यांनी स्वत: या योजनेकडे लक्ष केंद्रित केले आहे.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या वर्षी विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करण्यात येणार आहेत. गणवेश खरेदी करण्यासाठी शासनाने शाळांना सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसारच गणवेश खरेदी करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत गटशिक्षणाधिकार्‍यांकडून शाळांना निधी वितरीत करण्यात येत आहे. पी.झेड. रणदिवे, सहायक कार्यक्रमाधिकारी सर्वशिक्षा अभियान