आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी, बारावी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालये सज्ज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - फेबु्रवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बारावीच्या परीक्षा होणार आहेत. तर 1 मार्चपासून दहावीच्या परीक्षांना प्रारंभ होणार आहे. त्यामुळे शहरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पूर्वपरीक्षा तसेच कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
दहावी आणि बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची परीक्षा म्हणून ओळखली जाते. या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी अटीतटीचे तसेच शर्थीचे प्रयत्न केले जातात. यासाठी कॉपीचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला जातो. काही ठिकाणच्या शाळा तसेच महाविद्यालये कॉपी पुरविण्यासाठी प्रसिद्धही आहेत. त्याबाबत वारंवार चर्चाही झाल्या आहेत. अद्याप या परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी शहरातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षांचा माहोल तयार होत आहे. एस.एस.व्ही.पी.एस. कनिष्ठ महाविद्यालय, कमलाबाई कन्याशाळा, जिजामाता विद्यालय, महाजन हायस्कूल, शिवाजी विद्यालय आदी शाळांमध्ये सध्या दहावी आणि बारावीच्या पूर्वपरीक्षा सुरू आहेत. तसेच कॉपीमुक्त अभियानांतर्गत शाळांमध्ये ‘गैरमार्गाशी लढा’ हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. तसेच दहावी, बारावी नंतर काय? यासंदर्भात शाळांमध्ये व्याख्याने होत आहेत.
शिक्षण विभागात तयारी सुरू - दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात शिक्षण मंडळातर्फे अद्याप जिल्ह्यातील शिक्षण विभागाला कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. ‘गैरमार्गाशी लढा’ तसेच कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी जिल्ह्यात होणा-या कार्यक्रमाचे शिक्षण विभागातर्फे नियोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्या सभा घेणे, पथनाट्याद्वारे जनजागृती करणे, व्याख्याने आदी कार्यक्रमांचा यात समावेश राहणार आहे. यासंदर्भात विभागीय बैठक दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे पार पडली. या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. शंभर टक्के कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.