आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसच्या धडकेत वराडसीमचा दूध विक्रेता ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- औरंगाबादकडून भुसावळकडे येणार्‍या बसने चोरवडजवळ मोटारसायकलला दिलेल्या धडकेत वराडसीम (ता.भुसावळ) येथील दूध विक्रेते प्रभाकर देवराम वाणी (वय 50) यांचा मृत्यू झाला. एसटी महामंडळाच्या वेळकाढूपणामुळे वाणी यांचा जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी पोलिसांकडे केला.

सोयगाव डेपोच्या औरंगाबाद-भुसावळ बस (क्रमांक एमएच-14-बी-2537)ने चोरवडजवळ सोमवारी सकाळी 10 वाजता भुसावळकडून वराडसीमकडे जाणारे दूध विक्रेते प्रभाकर वाणी यांच्या मोटारसायकला धडक दिली. अपघातानंतर जखमी झालेल्या वाणी यांना रिक्षामधून भुसावळ पालिका दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात डॉक्टर हजर नसल्याने वाणी यांना पालिका दवाखान्यातून जळगाव हलवण्यासाठी एसटी डेपोमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी कोणत्याही उपचाराविना जखमी अवस्थेतील वाणी यांना दोन ते तीन तास बसवून ठेवण्यात आले. यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले असता त्यांचा मृत्यू झाला.

भुसावळ आगाराच्या वेळकाढूपणामुळेच वाणी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप वराडसीम येथील सरपंच कैलास कोल्हे, मुकुंदा वाणी, दीपक ढाके, हेमा पाचपांडे, निवृत्ती वाणी यांनी केला. तालुका पोलिस ठाण्यात निरीक्षक सुनील बोरसे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्याशी चर्चा करून एस.टी. महामंडळाचे अधिकारी आणि संबंधित कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या वेळी वराडसीम येथील ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. अपघातास कारणीभूत ठरलेली बस ताब्यात घेत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील बोरसे यांनी दिली.