आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवासी सामान वाहतुकीवर मर्यादा; महामंडळाचा नवा फतवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एसटीमधून प्रवास करताना सोबत असलेल्या सामानाच्या वजनावरही आता नियंत्रण आणावे लागणार आहे. प्रवासावेळी सोबत केवळ २० किलोपर्यंतच वजन बाळगता येणार आहे, तर अन्य ३० किलोचे भाडे आकारून, असे एकूण ५० किलोपर्यंत वजनाचे सामान प्रवाशाला बाळगता येणार आहे.

यासंबंधीचा निर्णय नुकताच एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात येऊन परिपत्रकही जारी केले आहे. एसटी महामंडळाच्या बसेसमधून मोठ्या प्रमाणात सामान तसेच इतर साहित्यांची वाहतूक केली जात असल्याने महामंडळाने हे पाऊल उचलले आहे. कमी पैशांत अधिक सामान वाहून नेण्याचे साधन म्हणून एसटीकडे पाहिले जात होते. त्यामुळे महामंडळाने यावर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला असून नववर्षापासून नवीन दराची आकारणी जाहीर केली आहे, तर १० जानेवारीपासून नव्या दराची आकारणी हाेणार आहे.

वाहकांवरही कारवाई
याबाबतची अंमलबजावणी करताना प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक सामान असेल, तर प्रवाशाला बसस्थानकावरील अधिकृत पार्सल कार्यालयातून वजन करून ते कुरिअर म्हणून बुक करावे लागेल. मार्ग पथकास तपासणीवेळी संबंधित प्रवाशाकडे नियमापेक्षा अधिक वजन आढळून आल्यास संबंधित वाहकासह प्रवाशांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. एसटी महामंडळाच्या सर्व आगारांसह वाहतूक निरीक्षक, पर्यवेक्षक, वाहनचालकांना यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत.

असे असतील दर
यापुढे एका प्रवाशास २० किलो वजनापर्यंत मोफत, तर त्यापुढील भारासाठी प्रति टप्पा व त्याच्या भागास ००.३० पैसे दर राहतील. यापूर्वी ठोक भाडे बंद केले असून टप्पानिहाय भाडे आकारले जाईल. ही भाडे आकारणी करताना लगेज तिकिटाचा रुपये १ हा कमीत कमी दर अाहे. लगेच तिकीट हे रुपयांच्या पटीत देण्यात येणार आहे. पन्नास पैशांच्या आतील रक्कम मागील रुपयात व पैसे किंवा त्यापुढील रक्कम त्या पुढील टप्प्यात घेण्यात येणार आहे. उदा. एक व्यक्ती सहा टप्प्यांचा प्रवास करताना सोबत ५० किलो सामान नेत असल्यास त्यास त्यातील २० किलोग्रॅम सामान मोफत वाहून नेता येईल; परंतु उर्वरित ३० किलोसाठी प्रतिटप्पा ०.३० प्रमाणे सहा टप्प्यांकरिता शुल्क लागेल.