आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपामुळे प्रवाशांचे हाल-बेहाल; खासगी वाहनधारकांकडून लूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ऐन दिवाळी पर्वात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. सलग दुसऱ्या दिवशीही एकही बस स्थानकाबाहेर निघाल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. ही संधी साधून काही खाजगी वाहनधारकांनी प्रवाशांकडून जादा पैसे उकळले. तर, काहींनी नियमित भाडे आकारून प्रवाशांची सोय केली.
 
संपामुळे दोन दिवसात एसटीच्या जळगाव विभागाला सुमारे अडीच कोटी रुपयांपर्यंतचा तोट सहन करावा लागला. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत संपावर तोडगा निघाल्याने संप कायम ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. गुरुवारी लक्ष्मीपूजनाचा मुहुर्त असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी वाढणार असल्याने त्यांची गैरसाेय हाेऊ नये म्हणून खाजगी वाहनधारकांना सुविधा देण्याचे अावाहन अारटीअाेने केले आहे. 
 
राज्यभरात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरु केलेल्या एसटीच्या संपावर शासनस्तरावर तोडगा निघून काही तासांत संप मिटेल, असा अंदाज कर्मचाऱ्यांना होता. मात्र, परिवहनमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांविरोधात भूमिका घेतल्याने संप अधिकच चिघळला. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही संप कायम राहिल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. एकीकडे दिवाळीच्या सुटीमुळे प्रवाशांची गर्दी वाढली तर, दुसरीकडे एसटीची चाके थांबल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो आहे. संपाचा फायदा घेत खासगी वाहनचालकांनी प्रवाशांकडून जादा पैसे उकळले. तर, काहींनी नियमित भाडे आकारून प्रवाशांची सोय केली. रेल्वेस्थानकावरही प्रवाशांची गर्दी वाढली आहे. बुधवारी सकाळी काही कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन निदर्शने केली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनही केले. तसेच सकाळी एक दोन कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचा प्रयत्न केला. मात्र संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी त्यांना बांगड्या भरण्याचा प्रयत्न केल्याचीही घटना आगारात घडली. बुधवारी वाहतूक पोलिस निरीक्षक आगारात थांबून होते. तर,पोलिसांसह क्यूआरटीचे जवान याठिकाणी तैनात आहेत. या संपाला सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियनतर्फे विजय पवार आणि भरत सैदाणे यांनी पाठिंबा दिला आहे. 
 
जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांशी संवाद 
बुधवारी सकाळी आम्ही जळगावच्या बसस्थानकात कर्मचाऱ्यांना शासनाची भूमिका समजावून सांगितली. त्यानुसार जिल्हाभरातील प्रत्येक डेपोत जाऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आहोत. हा संप ऐनवेळी पुकारलेला नाही. 
- नरेंद्रसिंह राजपूत, विभागीय सचिव, इंटक संघटना
 
बातम्या आणखी आहेत...