आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी महामंडळ : महिला वाहकाचा छळाचा आरोप; अधिकारी हादरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - एसटी महामंडळात वाहक असलेल्या महिला कर्मचा-याने लैंगिक छळाचा आरोप करताच एसटी मंडळाचे वरिष्ठ अधिकारी हादरले आहेत. विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांचेही नाव यात पुढे यायला लागल्याने ही खळबळ आणखी वाढली आहे. दरम्यान महिलेच्या तक्रारीवर समिती नियुक्त झाली आहे. आरोप असलेल्या अधिका-यांना या समितीला सामोरे जावे लागणार आहे. संबंधित महिला कर्मचारी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर उपोषणाला बसल्यामुळे अधिका-यांची जास्त कुचंबणा झाली आहे. यात संघटना राजकारण करीत असल्याचा आरोप करीत अधिका-यांनी दोन दिवसांत या महिलेची दखल घेतलेली नाही.

गेल्या काही वर्षांत एसटी महामंडळात महिला कर्मचा-यांची संख्या वाढली आहे.सध्या नव्यानेदेखील महिला कर्मचारी दाखल होत आहेत. मात्र, महिला कर्मचा-यांची सुरक्षा हा महामंडळांतर्गत वादाचा विषय होत आहे. अधिकारी तसेच सहकारी कर्मचा-यांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत असल्याची प्रकरणे पुढे येत आहेत.

काही दिवसांपूर्वी दोंडाईचा आगारात नव्याने रुजू झालेल्या आरती बोदडे या महिला कर्मचा-याला अशाच छळाला सामोरे जावे लागले आहे. त्यासंदर्भात बोदडे यांनी आगार व्यवस्थापक एन. के. चौधरी व वाहतूक निरीक्षक झेड. एच. राजपूत यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे. तसेच विभाग नियंत्रकांच्या आदेशानुसारच दोन्ही अधिका-यांनी त्रास दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यासंदर्भात चौकशी समिती नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र, जोपर्यंत विभाग नियंत्रक येथे कार्यरत आहेत. तोपर्यंत नि:पक्षपातीपणे चौकशी होणार नाही यासाठी विभाग नियंत्रकांची बदली करण्यात यावी, या मागणीसाठी आरती बोदडे यांनी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला दोन दिवस उलटले तरीदेखील वरिष्ठांकडून या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही. दरम्यान अशा पद्धतीने इतर महिला कर्मचा-यांनादेखील वरिष्ठांच्या जाचाला सामोरे जावे लागत असते. मात्र महिला तक्रारीसाठी पुढे येत नसल्याचे आरती बोदडे यांचे म्हणणे आहे. दरम्यान महामंडळांतर्गत महिला अन्याय-अत्याचार निवारण समितीदेखील अधिका-यांच्याच मर्जीतल्या असल्याने या समितीच्या माध्यमातूनही न्याय मिळत नसल्याचे समोर येऊ लागले आहे. परिणामी महामंडळांतर्गत महिलांचे होणारे शोषण थांबविण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

राजकीय वलय
आरती बोदडे यांच्या प्रकरणाला एसटी महामंडळ कर्मचारी संघटनेने राजकीय मुद्दा बनवलेला आहे. काही दिवसांपूर्वी आरती बोदडे यांनी फिनाइल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा मुद्दा घेऊन चौकशीची मागणी कर्मचारी संघटना करीत होते. मात्र, आज उपोषणाला बसलेल्या आरती बोदडे या आपण चुकून फिनाइल प्याल्याचे म्हणत आहेत. तसेच विभाग नियंत्रकांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, चौकशी सुरू असतानाच आंदोलन झाले. दरम्यान काही दिवसांपूर्वी आरती बोदडे यांनी प्रसिद्धी पत्रक काढले. त्यात विभाग नियंत्रकांच्या विरोधातच तक्रार करीत त्यांच्या बदलीची मागणी केली आहे. एकंदरीत पाहता या प्रकरणाला संघटनेकडून काहीअंशी राजकीय वलय निर्माण करण्यात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या आंदोलनात अधिकारी भरडले जात असल्याचेदेखील समोर येऊ लागल्याची स्थिती आहे.

काय आहे घटनाक्रम
एप्रिल महिन्यात आरती बोदडे यांनी रजेसाठी वरिष्ठांकडे दाद मागितली. मात्र, रजा मिळत नसल्याने फिनाइल पिऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात चौकशी समिती गठीत करण्यात आली. चौकशी सुरू असताना कास्ट्राईब संघटनेने नि:पक्षपातीपणे चौकशीसाठी आंदोलन केले. या आंदोलनानंतर आरती बोदडे यांनी उपोषण सुरू केले आहे.

आंदोलन सुरूच राहणार
- विभाग नियंत्रकांच्या सांगण्यावरून अधिकारी लैंगिक सुखाची मागणी करीत होते. नकार दिल्यानंतर शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. नाशिक येथून धुळे विभागात बदली झाली आहे.दोन महिन्यांत नाशिकला परत पाठविण्यात येणार होते. मात्र, अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही. आता जोपर्यंत विभाग नियंत्रकांची बदली होत नाही, तोपर्यंत उपोषण कायम राहील.
आरती बोदडे, उपोषणकर्त्या

चौकशीला सामोरे जाऊ
- एसटी मंडळ कार्यालयासमोर उपोषण करीत असलेल्या महिलेने आपल्यावर आरोप केले. मात्र, सध्या मंडळात 84 महिला वाहक असून, अजून शंभर महिला येणार आहेत. त्यांची काळजी घेणे हे आमचे काम आहे. महिलेने केलेल्या आरोपाबाबत समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्या समितीसमोर जाऊन बाजू मांडू. प्रकरणाला अकारण गालबोट लावले जात आहे.
राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक धुळे