जळगाव - एसटी महामंडळाकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या पास सुविधेत 25 वर्षांपर्यंत वयाची अट ठेवल्याने अनेक पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी या सुविधेपासून वंचित राहत आहेत. या वर्षाच्या अभ्यासक्रमास सुरुवात झाली असून, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढली आहे. बाहेरगावांहून शहरात शिक्षणासाठी येणा-या विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाकडून पासेस दिल्या जात आहेत. त्यासाठी या विभागाकडेही विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहेत. मात्र, महामंडळाने विद्यार्थी पासेसवर 25 वर्षे वयाची अट ठेवल्याने पदव्युत्तर शिक्षण घेणारे 25 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांना पासेस दिल्या
जात नाहीत. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना अधिक पैसे मोजून शिक्षणासाठी शहरात यावे लागत आहे. 25 वर्षांवरील बहुतांश विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर शिक्षणानंतर विविध कोर्सेस व उच्च शिक्षणासाठी शहरात येतात. एसटी महामंडळाला पासेसच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळत असतानाही महामंडळाची आर्थिक स्थिती बरी नसल्याचे कारण सांगत पासेस देण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे महामंडळाने विद्यार्थी पासेसची मर्यादा 25वरून 30 वर्षांपर्यंत करावी, अशी मागणी होत आहे.