आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

300 फुकट्या प्रवाशांवर कारवाई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - एसटीच्या धुळे विभागातील भरारी पथकाने वर्षभरात 300 जणांवर केली आहे. या कारवाईतून मोठा दंडही वसूल करण्यात आल्याची माहिती एसटी विभागाच्या अधिका-यांनी दिली आहे.
एसटी महामंडळाच्या धुळे विभागाकडून प्रवाशांच्या सोयीकरिता अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे 2011 या वर्षात धुळे विभागाला कोट्यवधीचा नफा झाला, असे असताना एसटीमधून विनातिकीट प्रवास करणा-यांची संख्याही मोठी आहे. अशा फुकट्या प्रवाशांना वचक बसावा यासाठी विभागाकडून पाच भरारी पथक स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येकी चार कर्मचारी आणि अधिकारी असलेल्या या पथकात एकूण 20 कर्मचारी आहेत. विभागीय वाहतूक अधिका-यांच्या नियंत्रणाखाली हे पथक कार्य करते. या पथकाने 2011 या वर्षात विनातिकीट प्रवास करणा-या सुमारे 300 फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. तर एप्रिल ते डिसेंबर या काळात सुमारे 282 जणांवर अशी कारवाई करण्यात आली आहे. यातून सुमारे 39 हजार 190 रुपयांचा दंड अशा प्रवाशांकडून आकारण्यात आला आहे. तर 12 हजार 59 रुपये तिकीट वसुली आकारण्यात आली आहे. दरम्यान, लांबच्या पल्ल्यातही असे फुकट प्रवासी आढळून आले आहेत.
या पथकात वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि इतर कर्मचारी काम पाहतात. यासाठी खासगी वाहने उपयोगात आणली जाऊन भरारी पथक बस थांबवून संशय असणा-या प्रवाशांकडील तिकीट तपासून पाहतात. या पथकाला धुळे जिल्ह्याव्यतिरिक्त इतर ठिकाणीही कारवाईचे अधिकार आहेत. तथापि वरिष्ठांकडून तसे आदेश झाल्यावरच अशी कारवाई होऊ शकते. 2011 मध्ये तशी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे अधिका-यांनी सांगितले आहे.
सहानुभूती आणि कर्तव्य - ब-याचवेळी कारवाई करण्यात आलेल्या प्रवाशांकडे पुरेसे पैसे नसतात. पैशांची चणचण अथवा गरिबीची झळ सोसत प्रवास करणारे प्रवासी तपासणीत समोर आल्यावर त्यांची विचारपूस होते. पैसे शिल्लक नसल्याचे समोर आल्यावर सहानुभूतीचा विचारही डोकावतो. तथापि भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असल्यामुळे कारवाई करावी लागते. अशा काही प्रकारांमध्ये सहप्रवाशांकडून एकत्रितपणे रक्कम देण्यात आल्याचाही अनुभव आहे, अशी माहिती एसटी विभागाच्या कर्मचा-यांनी दिली आहे.
४पथकाकडून दररोज वाहने तपासली जातात. पाच पथकांपैकी तीन पथक हे सकाळी आणि रात्रीच्यावेळी तपासणी करतात. तर उर्वरित दोन पथकांवर दुपारी निघालेल्या वाहनांची तपासणी करण्याची जबाबदारी असते. याशिवाय मुंबई डिव्हीजनकडून सूचित करण्यात आल्यावर धुळे विभागाव्यतिरिक्त इतर ठिकाणीही कारवाई केली जाते. - जी.टी. ठाकरे, विभागीय वाहतूक अधिकारी.
दंड आकारण्याची पद्धत - प्रवासादरम्यान असे प्रवासी आढळून आल्यानंतर त्यांच्यावर एसटी विभागाच्या कायद्यान्वये कारवाई होते. कमी पल्ल्याच्या प्रवासात अशा प्रवाशांकडून दुप्पट भाडे किंवा 100 रुपये या दोघांपैकी जी रक्कम जास्त असते ती दंड स्वरूपात आकारण्यात येते. तर लांबच्या प्रवासात आढळणा-या फुकट प्रवाशाकडून तिकीट वसुली केली जाते.