आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ST Recruitment Corruption News In Marathi, Divya Marathi

एसटी मंडळ भरतीच्या यादीतून निवड झालेल्यांची नावे गायब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- परिवहन मंडळाच्या भरतीवरील स्थगिती एकदाची उठली ; पण ज्यांची निवड झाली त्यांचीच नावे यादीतून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एमकेसीएलने याबाबत एक भूमिका घेतली आहे तर एसटी मंडळाने मात्र चुप्पी साधली आहे.

परिवहन महामंडळाने सन 2012मध्ये रिक्त पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवली. मात्र, यामध्ये सेवा योजन कार्यालयातील उमेदवारांची यादी फेटाळली. परिणामी सेवा योजन कार्यालयाने न्यायालयात धाव घेतली. यातून भरती प्रक्रियेला स्थगिती मिळाली. स्थगितीपूर्वीच एमकेसीएलने लेखी परीक्षेतील उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्या यादीच्या आधारे बहुतांश उमेदवारांनी आपल्याला महामंडळात नोकरी मिळणार असल्याच्या आशेने स्थगिती उठावी म्हणून प्रयत्न सुरू केले. त्यासाठी वेगवेगळे राजकीय पक्ष प्रमुख, शासकीय अधिकार्‍यांच्या भेटी घेणे, निवेदन देण्यासह निदर्शने करण्यात आली.

दरम्यान गेल्याच महिन्यात उच्च न्यायालयाने काही अटी, शर्थींच्या अधीन राहून भरतीवरील स्थगिती उठविली आहे. स्थगिती उठविल्यानंतर एमकेसीएलने नव्याने सुधारित निवड यादी जाहीर केली आहे. या निवड यादीत व पूर्वीच्या निवड यादीत मात्र प्रचंड तफावत आहे. पूर्वीच्या निवड यादीत निवड झालेल्या बहुतांश उमेदवारांची या यादीत नावे नसल्याचे समोर आले आहे. तर काहींची नावे खालीवर झालेली आहेत. सुधारित यादी जाहीर करीत असताना एमकेसीएलने सात प्रश्न चुकीचे होते. त्यामुळे दुरुस्ती करून सुधारित निवड यादी जाहीर केल्याचे विभाग नियंत्रकांकडून सध्या सांगण्यात येत आहे. दरम्यान ज्या उमेदवारांची 2012मधील निवड यादीत निवड झाली होती. त्यांची नावे 2014च्या निवड यादीत समाविष्ट नाहीत.

अनुसूचित जाती प्रवर्गातून निवड झाली होती ; परंतु तिसर्‍या यादीतून नाव गायब झाले आहे. दोन मार्क कमी असलेल्या महिलेची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे संभ्रम वाढला आहे. यातून न्याय मिळायला हवा. योगिता नारायण चंद्रे, लिपिक पदाच्या उमेदवार

पहिली यादी जाहीर झाल्यानंतर एमकेसीएलने दुसरी यादी जाहीर केली. प्रश्नपत्रिकेत सात प्रश्न चुकीचे होते. त्यासह पहिली यादी जाहीर झाली होती. मात्र, सुधारित यादीत चुकीच्या प्रश्नांचे गुण वगळण्यात आले आहेत. ते पाहावे लागतील. राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक