आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Minister Sanjay Sawakare To Accept Development

संजय सावकारे पर्व; अर्थात, शरद पवारांचे ‘तरुण स्वप्न’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘संतोष चौधरी यांनी एकमेव चांगले काम केले आहे आणि ते म्हणजे संजय सावकारेंसारखा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला.’ हे विधान आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अर्थात, शरद पवार यांचे. जळगावच्या अडीच दिवसांच्या भेटीत पवार यांनी संजय सावकारेंशी साधलेल्या संवादाचे साक्षीदार असलेल्या नेत्यांनीच पवारांचे हे विधान उघड केले होते. हेच पवार मंत्रिमंडळातील फेररचनेत संजय सावकारे यांना संधी देतील, ही शक्यता होती ती त्यामुळेच. त्यादृष्टीने पाहिले तर संजय सावकारे हे शरद पवार यांचे तरुण स्वप्न आहे. पवारांनी भाकरी फिरवली आहे. आता परीक्षा या भाकरीचीच आहे. जळगावातील या सत्ताकेंद्राच्या स्थानांतराचे होणारे बरेवाईट परिणाम टिपण्याचा ‘दिव्य मराठी’च्या टीमने केलेला हा एक प्रयत्न..

रावेर लोकसभा मतदारसंघात या बदलाची जादू चालेल का?
आमदार संजय सावकारे यांचे राज्यमंत्री पद पक्षाला रावेर लोकसभेसाठी कितपत फायदेशीर ठरेल? वेगवेगळ्या राजकीय गटांमध्ये विखुरलेला दलित समाज सावकारेंच्या नेतृत्त्वाखाली संघटित होईल का? असे प्रश्न यानिमित्त उपस्थित केले जात आहेत.

लेवा पाटीदार, मराठा, मुस्लिम आणि दलित मतांवर विजयाचे गणित अवलंबून असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघात सावकारेंच्या नेतृत्वगुणांचा कस लागेल. ज्या शहरावर लोकसभेतील जय-पराजय ठरतो, त्या सावकारेंच्या भुसावळात सातत्याने भाजपला मताधिक्क्य मिळाले आहे. भाजपची ही भक्कम फळी फोडणे सहज शक्य नाही. यासाठी खास करून मराठा, मुस्लिम आणि दलित मतांना सोबत घेण्याची रणनीती सावकारे किती प्रभावीपणे राबवतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. भुसावळ शहरातील दलित समाज वेगवेगळ्या गटांमध्ये विखुरलेला आहे. लोकसभेसाठी राजू सूर्यवंशी(गवई गट), आमदारकीसाठी पीआरपीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, महायुतीत असलेल्या रिपाइं (आठवले गट)चे उत्तर महाराष्ट्रातील सर्वेसर्वा रमेश मकासरे राजकीय स्पर्धेत स्वत:चे स्थान बळकट करण्यासाठी पूर्ण क्षमतेने उतरतील. यापैकी जगन सोनवणे आमदार सावकारेंचे कडवे विरोधक म्हणून प्रसिद्ध आहेत. यामुळे तूर्ततरी दलित मते राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकवटण्याची शक्यता धूसर आहे. या मतदारसंघात लेवा पाटीदार समाज निर्णायक आहे. आतापर्यंत केवळ भुसावळात अडकलेल्या आमदार सावकारेंना लोकसभेसाठी लेवा पाटीदार समाजाला पक्षासोबत जोडण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. अनेक वर्षांपासून शरद पवारांसोबत असलेल्या मराठा समाजातील राजकीय कार्यकर्ते, ज्येष्ठ पदाधिकारी निर्णय प्रक्रियेपासून दुरावणार नाही, याचीही दक्षता सावकारेंना घ्यावी लागणार आहे.

थोडक्यात चित्र असे
रावेर लोकसभा मतदारसंघातील भुसावळात सेना-भाजपची ताकद तुल्यबळ आहे. शेजारील जामनेर तालुक्यात राज्यसभा सदस्य ईश्वरलाल जैन राष्ट्रवादीला कितपत मदत करतील? यावर पक्षाचे गणित ठरेल. मुक्ताईनगर-बोदवडमध्ये विरोधी पक्षनेत्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी खडसेंच्या राजकीय विरोधकांची मोट बांधू शकते. रावेर-यावलमध्ये आमदार शिरीष चौधरी राष्ट्रवादीच्या तुलनेत तुल्यबळ आहेत. तर लोकसभेत स्वत:च्या यावल तालुक्यात खासदार हरिभाऊ जावळे दोन हात करण्याच्या तयारीत आहेतच. चोपड्यात ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी व राष्ट्रवादीच्या आमदारांचा दिलासा असला तरी मलकापूर-नांदुर्‍यात आमदारांना नेटवर्क उभारावे लागेल.

तुलना देवकर आणि सावकारे यांच्या व्यक्तिमत्त्वाची

गुलाबराव देवकर
> प्रशासनावर प्रभाव नाही
> अधिकार्‍यांचे म्हणणे प्रमाण मानत
> प्रशासनाशी मृदू वागत राहिले
> पक्षांतर्गत गटबाजीला खतपाणी
> इतर पक्षात मात्र चांगले संबंध
> संघटनात्मक महत्वाचे पद नाही
> नगरसेवकपदापासून दीर्घ अनुभव
> शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मनुष्यबळ
> आर्थिक बळात कमी नाही

संजय सावकारे
> प्रशासनावर पकड असते
> प्रशासकीय नियम, कायद्यांची माहिती
> इगो असल्याची प्रशासनात भावना
> पक्षांतर्गत सर्वच नेत्यांशी चांगले संबंध
> इतर पक्षातही चांगले संबंध
> सध्या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष
> राजकीय कारकिर्द अत्यल्प
> सहकारी वा अन्य संस्था नाहीत
> कार्यकर्ते जपण्यासाठी आर्थिक बळ कमी

जळगाव महापालिकेत ‘महाआघाडी’च्या नियोजनात बिघाडी शक्य!

का बारगळू शकते महाआघाडी?
> मंत्रिपद गेल्याने देवकरांनी महापालिका निवडणुकीतून लक्ष काढून घेतले तर
> महापालिका निवडणुकीची जबाबदारी सावकारेंवर टाकली तर
> सावकारेंकडून उमेदवारांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता कमी असल्यामुळे
> सावकारे पक्षाच्या अस्तित्वाला जास्त महत्व देणारे असल्यामुळे

महाआघाडी झाल्यास कारणे काय?
> देवकरांइतकेच सावकारेंशीही एकनाथ खडसे यांचे सलोख्याचे संबंध आहेत
> सावकारेंचा घरकूल प्रकरणाशी संबंध नसल्याने भाजपाला सोईचे
> मनपापेक्षा लोकसभेला महत्वाचे असे सावकारेंनी ठरवले तर.
> आमदार व खासदार जैन यांची सद्दी संपविण्यासाठी पक्षनेत्यांनीच परवानगी दिली तर.

कशी बदलू शकते परिस्थिती?
> उमेदवार निश्चितीत विनोद देशमुखांना महत्व दिले जाईल.
> डॉ. अस्मिता पाटील यांच्या कार्यकर्त्र्यांनाही संधी मिळू शकेल.
> राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पक्षाकडून येणार निधी आणि स्वनिधी यावरच निवडणूक भागवावी लागेल.
> सावकारेंना जळगाव महापालिकेत यश मिळू नये म्हणून त्यांचे विरोधक राष्ट्रवादीचे नुकसान करतील.