जळगाव- ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी आणलेल्या सात आकर्षक योजनांचा विविध वयोगटांतील प्रवासी लाभ घेत आहेत. त्यात वार्षिक सवलतीपासून प्रासंगिक करार, आवडेल तेथे प्रवास यासोबतच संगणकीय आरक्षण, इंटरनेट सुविधा अादीचा समावेश आहे. दरम्यान, जळगाव विभागातील ११ आगारांमध्ये या सर्व सुविधा उपलब्ध असून, प्रवाशांनी त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
"गाव तेथे रस्ता रस्ता तेथे एसटी' असे राज्य परिवहन महामंडळाचे धोरण आहे. महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खास आकर्षक सुविधा मिळण्याच्या उद्देशाने या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या सर्व योजनांना प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, वार्षिक सवलत कार्ड योजनेत २०० रुपये असलेल्या कार्डद्वारे प्रवास भाड्यात वर्षभर १० टक्के सवलत प्रवाशांना मिळणार आहे. इतकेच नव्हे, तर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या अपघातात मृत्यू झाल्यास नुकसानभरपाईव्यतिरिक्त दीड लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. याशिवाय "आवडेल तेथे प्रवास’ ही योजना राज्य आंतरराज्यासाठी उपलब्ध आहे. या याेजनेच्या माध्यमातून चार दिवस-सात दिवसांच्या पासमध्ये प्रवाशांना कोठेही फिरता येते. त्यात प्रवासी तीर्थस्थळे, प्रेक्षणीय स्थळे, परीक्षा, व्यापार आदीसाठी अत्यंत कमी भाड्यात सेवा घेता येत असून, एसटी महामंडळही आता हायटेक होत आहे.
या आहेत सुविधा
विद्यार्थीवा प्रवासी गट, सामूहिक सहल, लग्नसराई इतर समारंभांसाठी बसेस प्रासंगिक करारावर उपलब्ध आहेत. राज्य आंतरराज्यात ही सुविधा उपलब्ध असून, प्रासंगिक कराराची बस १२ तासांच्या आत परत आल्यास शंभर किमीची सूट करार करणाऱ्या व्यक्तीला मिळते. तसेच अाता बसस्थानकांवर संगणकीय आगाऊ आरक्षण इंटरनेट तिकिटांची सुविधाही प्रवाशांना मिळणार अाहे.
> २० दिवसांच्या भाड्यात महिनाभर प्रवास
> ५० दिवसांच्या भाड्यात ९० दिवस प्रवास
> मासिक त्रैमासिक पास योजना
> वार्षिक सवलत कार्ड
> ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजना
> इंटरनेट तिकिटाची सुविधा
> लग्नसमारंभासाठी प्रासंगिक करार