आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • State Transport Not Taken Any Serious Action Against Roof Tuf Stephine

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीवघेण्या अपघातानंतरही सुस्त, राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाचे धोक्याकडे दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- एसटी बसच्या टपावर ठेवलेले चाक (स्टेपनी) शेजारच्या रिक्षावर पडल्याची गंभीर घटना घडूनही राज्य परिवहन विभागाचे प्रशासन पूर्णपणे गाफिल आहे. त्यामुळे अजूनही सर्वच बसेस टपावर जीवघेणा धोका घेऊनच धावताहेत.

दोन दिवसांपूर्वीच शहरात स्पीडब्रेकरवर उधळलेल्या बसच्या टपावरून स्टेपनी शेजारच्या रिक्षावर पडल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले होते. रिक्षात प्रवासी नसल्याने कोणीही जखमी झाले नाही आणि प्रकरण आपापसात मिटवण्यात आले. रिक्षात प्रवासी असते किंवा ते चाक रिक्षाऐवजी एखाद्या दुचाकीस्वाराच्या डोक्यावर पडले असते तर जीवितहानी ठरलेली होती. तसे न घडल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनानेही याकडे पूर्णपणे डोळेझाक केली आहे.

ना हूक, ना दोर!
लांब पल्लय़ाच्या बसेससाठी खबरदारी म्हणून पूर्ण हवा भरलेले अतिरिक्त चाक बससोबत दिले जाते. रस्त्यात चाक पंक्चर झाले तर बस अडकून पडू नये, यासाठी ही खबरदारी प्रवाशांच्या हिताचीच असली तरी हे चाक बसच्या टपावर नुसतेच टाकून दिले जाते. ते टपावरच्या कॅरियरला बांधण्याची किंवा हूकमध्ये अडकवण्याची तसदी कोणीही घेत नाही, असे ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहाणीत आढळून आले आहे. यासंदर्भात यांत्रिकी कार्यशाळेतील संबंधितांशी बोलल्यानंतर परिवहन महामंडळाने असा कोणताही विचार केलेला नाही आणि चाक अडकवून अथवा बांधून ठेवण्याची सोय केलेली नाही हे स्पष्ट झाले. त्यामुळे रस्त्यावरून जाणारे अन्य प्रवासी चाक डोक्यावर पडून मेले तरी आम्हाला काही देणे-घेणे नाही, अशीच प्रशासनाची बेफिकीर वृत्ती समोर आली आहे.

जीविताला धोका
बसची स्टेपनी सुमारे 125 किलो वजनाची असते. बस आदळली तर टपावरची स्टेपनी बसच्या उंचीपेक्षाही वर फेकली जाऊन नंतर खाली पडते. बसची उंची 10 फूट असेल तर 125 किलोची स्टेपनी किमान 11 फुटांवरून खाली पडेल. इतक्या उंचीवरून इतकी जड वस्तू कोणाच्या अंगावर पडल्यास मेंदूला गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकते. त्यामुळे मानसिक अपंगत्व येऊ शकते. मानेचे मणके तुटून जीवही जाऊ शकतो किंवा कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकते. तसेच हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. डॉ. रणजित चव्हाण, आर्थोपेडिकतज्ज्ञ

चाक टपावर नुसतेच दिले टाकून
जळगाव आगारात 128 गाड्या आहे. यातील 35 बसेसबरोबर स्टेपनी देण्यात आल्याचे अधिकारी सांगतात. ही स्टेपनी कशी ठेवली जाते, याची चाचपणी ‘दिव्य मराठी’ चमूने केली. या वेळी बसस्थानकात 24 बसेस उभ्या होत्या. त्यापैकी सहा बसेसवरच स्टेपनी आढळून आली; मात्र बसच्या टपावर चढून तपासले असता तेथे स्टेपनी नुसतीच तिथे टाकून दिलेली आढळली. त्यामुळे ती सहज हलविता येत होती.

कॅरियरवर काहीच सुविधा नाही
बसेसवर स्टेपनी लावण्याचे काम यांत्रिक विभागातील टायर फीडर करतात. बसच्या टपावर ती यंत्राच्या सहायाने चढवली जाते. मात्र, ज्या प्रमाणे खासगी वाहनांना स्टेपनी ठेवण्याची स्वतंत्र सोय असते किंवा ती नट बोल्टने पक्की करण्याची व्यवस्था असते, तशी कोणतीही सोय बसच्या बाबतीत आढळून आली नाही. ज्या बसेसला टपावर कॅरिअर लावलेले असते त्या बसवर स्टेपनी असते. या कॅरिअरला स्टेपनी पक्की करण्याची कसलीच व्यवस्था नसते. प्रवाशांचे लगेज बांधण्यासाठी बर्‍याचदा दोर उपलब्ध असतो; पण त्या दोराने चाक बांधण्याची तसदी मात्र परिवहन विभागाचे कोणतेही कर्मचारी घेत नाही. हे काम नक्की कोणाचे, याबाबतही संभ्रम असल्याचे आढळून आले.

वरिष्ठांच्या मंजुरीनंतर बसवू साखळी
प्रवासाच्या अंतरानुसार बसेसवर स्टेपनी लावली जाते. ती कॅरिअरवर पक्की करण्याची अथवा बांधली जाण्याची आवश्यकता आहेच. याबाबत वरिष्ठांकडून साखळी बसविण्यास मंजुरी मिळाल्यास तशी व्यवस्था केली जाईल. उन्मेश शिंदे, सहायक निरीक्षक, यांत्रिकी कार्यशाळा

128 गाड्या जळगाव आगारात
35 लांब पल्ल्याच्या एसटीत स्टेपनी
125 किलो स्टेपनीचे एकूण वजन