आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stiring Story In Marathi, Collector Rubal Speaking With Divya Marathi Team

निर्णय घेण्याचे धाडस केल्यानेच आयएएस झाले!- जिल्हाधिकारी रुबल अग्रवालांनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- व्यवसाय आणि व्यापार ही कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने लग्नापुरते शिक्षण घ्यावे, असा कुटुंबांचा कल होता. मात्र, मी स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांचे देखील पाठबळ मिळाल्याने मी राजस्थानातील देवलीसारख्या छोट्या शहरातून पहिली महिला आयएएस होऊ शकले. निर्णय घेण्याचे धाडस केल्यानेच आयएएस अधिकारी झाल्याचे मत नूतन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले. ‘दिव्य मराठी’शी साधलेला संवाद त्यांच्याच शब्दात..

महिलांनी त्यांची निर्णय क्षमता स्वत: सिद्धी केली पाहिजे. या निर्णयामुळेच मी आज इतपर्यंत पोहोचली. माझे शिक्षण राजस्थानातील टोंग जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात तर महाविद्यालयीन शिक्षण अजमेर विद्यापीठातून झाले. शिक्षण घेऊन काय करायचे, याचा निश्चय मी शिक्षण सुरू असतानाच केला. कला शाखेच्या दुसर्‍या वर्षाला असताना मी यूपीएससीची परीक्षा दिली. 2004 मध्ये पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर दुसर्‍या प्रयत्नात 2008 मध्ये आयएएस उत्तीर्ण केले.

एका छोट्याशा शहरातील व्यावसायिक कुटुंबात मी वाढले. वडील आणि मोठा भाऊ दोघेही व्यावसायिक आहेत. मोठय़ा बहिणीचे लग्नदेखील व्यावसायिक कुटुंबात झाले. आरक्षणामुळे महिला पुढे येत असल्या तरी राजस्थानात महिला आजही निर्णय घेतांना फारसे धाडस करीत नाहीत. शिक्षणाचा विषयही केवळ लग्नापुरता र्मयादीत आहे. त्यादृष्टीने बदल होणे आवश्यक आहे.

जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय जबाबदारीला प्राधान्य असले तरी कुटुंबही तेवढेच महत्त्वाचे आहे. पती पुण्यात इन्फोसिस कंपनीत नोकरीला आहेत. तर मुलगा एक वर्षाचा आहे. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी आणि प्रशासकीय कामे अशी दुहेरी भूमिका पार पाडावी लागते.

राजस्थानच्या परंपरेतून आल्याने मलाही राजस्थानची संस्कृती प्रिय आहे. कुकिंग ही माझी विशेष आवड आहे. त्यामुळे वेळ काढून विकेंडला ही आवड मी जोपासते. विशेष आवड असलेल्या नृत्याकडे मात्र वेळेअभावी लक्ष देता येत नाही. अनेक वर्षांपासून त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. राजस्थानचे पारंपरिक घुमर नृत्य ही विशेष आवड आहे. शहरातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या युवक, युवतींना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची पद्धत, वेळेचे नियोजन, कोणती पुस्तके वाचावी, मुलाखत आणि इतर विषयांचे मार्गदर्शन करण्याचा माझा मानस आहे. अर्थात यासाठी वेळ कसा मिळेल हा प्रश्न असला तरी महिन्यातून एका रविवारी युवकांना मार्गदर्शन करणार आहे.

जिल्हाधिकारी म्हणून रूजू होण्यापूर्वी जिल्हा परिषद सीईओ, प्रांताधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने महसूल यंत्रणा, ग्रामीण विकासाचे विविध पैलू समजून घेता आले. यात युवक आणि महिलांसाठी खूप काही करण्याची संधी असल्याचे जाणवले.