आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - मला नवरा नेहमी त्रास देत होता. वारंवार तो माझ्याशी भांडण करायचा. गुरुवारी दुपारी तो घरी आला त्यानंतर पुन्हा रात्रीही तो घरी आला; त्या वेळी मी गाढ झोपेत होते. आधी त्याने मुलाला मारले व नंतर मला मारहाण केली, असा जबाब मृत बालक वीरेंद्रची आई मीनाक्षी हिने पोलिसांकडे नोंदवला आहे. तर वीरेंद्रचा पिता प्रमोद याने जबाबात म्हटले की, मी पत्नीच्या डोक्यात दगड घालत असताना तो दगड भिंतीवर आदळून वीरेंद्रच्या डोक्यात पडला. त्यामुळेच वीरेंद्रचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. दोघांची प्रकृती स्थिर असून प्रमोदवर जिल्हा रुग्णालयात, तर मीनाक्षीवर ओम क्रिटिकलमध्ये उपचार सुरू आहेत.
गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेत सात वर्षीय बालक वीरेंद्रचा मृत्यू झाला होता. कौटुंबिक कलहातून पती-पत्नीत झालेल्या वादातून पतीने आपल्या मुलाचा खून केला होता. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी शनिवारी जिल्हा रुग्णालयात जाऊन प्रमोदचा जबाब नोंदवला. जबाबात त्याने पोलिसांना सांगितले की, माझे व पत्नीचे वारंवार भांडण होत होते. अनेकदा सांगूनही ती ऐकत नव्हती. आमचे गुरुवारी असेच भांडण झाले. रागाच्या भरात मी तिच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला; मात्र तो दगड भिंतीवर आदळून शेजारीच झोपलेल्या माझ्या मुलाच्या (वीरेंद्र) डोक्यात पडला. पोलिसांनी मृत वीरेंद्रची आई मीनाक्षी हिचादेखील जबाब नोंदवून घेतला. जबाबात तिने सांगितले, की मी घरात झोपलेले असताना नवरा प्रमोदने वीरेंद्रचे डोके भिंतीवर आपटले. त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांना शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. अहवालात मृत वीरेंद्रच्या मेंदूजवळ जखमा व रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. वीरेंद्रचा मृत्यू ज्या दगडामुळे झाला तो दगड 17 किलो वजनाचा आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.