जळगाव- काम न करता पगार लाटणार्या प्रतिस्पर्धी युनियनच्या 17 कर्मचार्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी खान्देश कामगार उत्कर्ष संघटनेतर्फे मंगळवारी आंदोलन करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी बुधवारी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे नेते ललित कोल्हे यांनी केले.
एमआयडीसीतील कापडनिर्मिती करणार्या रेमंड कंपनीत युनियन ताब्यात घेण्यावरून संघर्ष सुरू आहे. कामगार उत्कर्ष सभा युनियनमधील 17 पदाधिकारी कर्मचारी काम करत नाहीत. तसेच व्यवस्थापनासमोर हा प्रकार सुरू असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. काम न करता पगार लाटणार्या या कर्मचार्यांमुळे इतर कर्मचार्यांवर परिणाम होत आहे. केवळ हजेरी लावून पगार लाटणार्या 17 कर्मचार्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी खान्देश कामगार उत्कर्ष संघटनेतर्फे मंगळवारी सकाळी 11.30 वाजेपासून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पहिल्या शिफ्टचे सुमारे 650 कायम कर्मचारी सहभागी झाले होते.
दरम्यान, या वेळी रेमंड कंपनीच्या मानव संसाधन विभागाचे कार्यकारी अधिकारी नीलेश पाटील यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली; मात्र जोपर्यंत व्यवस्थापनाचे अधिकारी चर्चेसाठी येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा ललित कोल्हे यांनी घेतला. त्यानंतर कंपनीचे कार्यकारी संचालक ए.एस.नागराजा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. आपण शहराबाहेर असल्याने बुधवारी याप्रकरणी चर्चा करू, असे सांगून त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यामुळे दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले.
मागणी मान्य होईपर्यंत लढा राहील सुरु
प्रतिस्पर्धी युनियनचे पदाधिकारी कुठलेही काम न करता पगार लाटून इतर कर्मचार्यांना चिथावणी देतात. त्यामुळे अशा कामचुकार कर्मचार्यांवर व्यवस्थापनाने कारवाई करावी, अशी संघटनेची मागणी आहे. याप्रकरणी व्यवस्थापनाने बुधवारी चर्चेसाठी बोलावले आहे. तोडगा न निघाल्यास लढा सुरूच राहील. ललित कोल्हे, खान्देश कामगार उत्कर्ष संघटना
केवळ पगार लाटणार्या कर्मचार्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संतप्त झाले होते. त्यावेळी संघटनेने आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती करताना कंपनीच्या मानव संसाधन विभागाचे कार्यकारी अधिकारी नीलेश पाटील.