आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्यांमुळे माझं सायकलीवर शाळेमध्ये जाणं झालं बंद!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अादर्शनगरात खूप कुत्रे झाले अाहेत. ते येणाऱ्या जाणाऱ्यांवर झुंडीने हल्ले करतात. मी राेज शाळेत सायकलीने जायचाे. परंतु गेल्या अाठ दिवसांपासून शाळा बंद करावी लागली अाहे. नगरसेवक काकांकडे तक्रार करूनही काही उपयाेग झाला नाही. या कुत्र्यांचं काहीच हाेऊ शकत नाही का? मला सायकलीनेच शाळेत जायचं अाहे, अशी अगतिक विनवणी वजा व्यथा सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय देवदत्त या मुलाने थेट ‘दिव्य मराठी’कडे मांडली अाहे. 
 
अादर्शनगरातील सृष्टी अपार्टमेंटमध्ये राहणारा देवदत्त महेंद्र दीक्षित हा अाेरिअाॅन सीबीएसई इंग्लिश मीडियममध्ये सातवीत शिकत अाहे. त्याने सहावीपासून सायकलीने शाळेत जाण्यास सुरुवात केली अाहे. मात्र, गेल्या साेमवारी अादर्शनगरातून जात असताना एका चारचाकी गाडीच्या खाली बसलेले दाेन कुत्रे बाहेर येऊन भांडू लागले. ते देवदत्तच्या सायकलीसमाेर अाले. त्याने सायकल बाजूला घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी ते दाेन्ही कुत्रे त्याच्यावर धावून गेले. या धक्कादायक प्रसंगाने देवदत्तची शाळेत सायकलीवर जायची हिम्मत नाहिशी झाली. ताे अाता वडिलांना शाळेत साेडायला सांगत अाहे. त्याचे वडील महेंद्र हे खासगी कंपनीत तंत्रज्ञ व्यवस्थापक अाहेत. ते दुपारी त्याला शाळेतून अाणण्यासाठी खास घरी येत अाहेत. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

नगरसेवक काकांकडे तक्रारीचाही उपयाेग नाही 
देवदत्तने ‘दिव्य मराठी’कडे अापली व्यथा मांडण्यापूर्वी अादर्शनगर परिसराचे नगरसेवक पृथ्वीराज साेनवणे यांच्याकडे दुसऱ्याच दिवशी लेखी तक्रार केली. मात्र, त्या काकांनी सांगितले, काही उपयाेग हाेणार नाही. कायद्याने कुत्रे पकडता येत नाही. त्यांना मारू शकत नाही. त्यामुळे मी काही करू शकत नाही, असे साेनवणे यांनी सांगितल्याने देवदत्त नाराज झाला. म्हणून ‘दिव्य मराठी’ला फाेन लावल्याचे देवदत्त म्हणाला. 

कुत्र्यांचं काेणीच काही करू शकत नाही का? 
परिसरातील कुत्र्यांमुळे माझे शाळेत सायकलीने जाणे बंद झाले. कुत्र्यांचं काेणीच काही करू शकत नाही का? यामुळे मला निमयित सायकलीने शाळेत जाताच येणार नाही का? असे अनेक भाबडे प्रश्न देवदत्त याला पडले अाहेत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...