आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलावात बुडून एकाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - गणपती विसर्जन करत असताना गाळात अडकून मोहन सुनील मराठे (वय 16, रा.सदाशिवनगर, पीपल्स बॅँक कॉलनी) याचा बुधवारी दुपारी तीन वाजता मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, प्रशासनाने वेळेवर मदतकार्य न केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पीपल्स बॅँक कॉलनीत यंदा पहिल्यांदाच गणपती बसवण्यात आला होता. विसर्जनासाठी कॉलनीतील 30-35 मुले व नागरिक दुपारी 2 वाजता मेहरूण तलावावर गेले होते. लहान गणपती पाण्यात सोडल्यानंतर मंडळाचा गणपती घेऊन मोहन मराठे, लक्ष्मण र्शावण चौधरी (वय 40), राकेश देविदास भारंबे (35) व खगेश दिलीप कोल्हे (वय 14) हे चारही जण सुमारे 50 ते 60 फूट अंतर पुढे गेले; मात्र छातीच्या उंचीपर्यंत पाणी असतानाच अचानक समोर खड्डा आल्यामुळे चौघे जण खोल पाण्यात बुडू लागले. हे तलावाच्या काठावर उभ्या असलेल्या योगेश पाटील व दीपक पाटील यांनी पाहिल्यानंतर त्यांनी पाण्यात उड्या घेत लक्ष्मण, राकेश आणि खगेश यांना बाहेर काढले; परंतु मोहनचा हात निसटल्यामुळे तो पाण्याखाली गेला. बचावलेले लक्ष्मण चौधरी सामान्य रुग्णालयात, राकेश भारंबे हे ओम क्रिटीकलमध्ये उपचार घेत आहेत, तर खगेश घरी परतला आहे.

प्रशासनाने त्वरित मदत न केल्याचा आरोप
घटना घडल्यानंतर नागरिकांनी पोलिस आणि पालिका प्रशासनाला याबाबत माहिती देत मोहनला वाचवण्याची विनवणी केली; परंतु पोलिस किंवा पालिकेच्या कर्मचार्‍यांनी तत्परता दाखवली नाही. काही वेळाने पालिकेचे लाइफ गार्ड पोहोचले. त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या; मात्र काही वेळ प्रय} करून त्यांनी असर्मथता दर्शवत घटनास्थळ सोडून दिले. यादरम्यान मोहनचे मित्र व परिसरातील नागरिकांनी दिसेल त्याला विनवण्या केल्या; मात्र कोणीही मदतीला तयार झाले नाही. सायंकाळी वराडसीम येथून सात जण आले. त्यांनी रात्री साडेआठ वाजता मोहनचा मृतदेह बाहेर काढला.

एकाला पोलिसांनी वाचवले
गिरणापात्रात विसर्जनकरुन परताना एक युवक काटेरी झुडुपात अडकला. त्यामुळे तो खोल पाण्यात ओढला जात असताना तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी मधुकर पाटील व जगदीश खर्चाणे यांनी दोरीच्या साह्याने त्याला तत्काळ बाहेर काढले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.

परिवारावर दुहेरी संकट
मृत मोहनचे वडील सुनील मराठे ट्रक ड्रायव्हर आहेत. दोन महिन्यांपूर्वी मूर्तिजापूर येथे महामार्गावर त्यांच्या ट्रकला अपघात झाला होता. त्यात त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर सध्या त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत. अशा स्थितीत मोहनबाबत घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या परिवारावर दुहेरी संकट कोसळले आहे. मोहन नूतन मराठा महाविद्यालयात 11वी विज्ञान शाखेत शिकत होता. त्याला एक मोठा भाऊ असून, तो आयटीआयमध्ये शिक्षण घेत आहे.