आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, शौचालये केवळ नावापुरतीच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने शाळेच्या आवारात मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. स्वच्छतागृहासाठी सर्व शिक्षा अभियान आणि नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येतो. मात्र, बहुतांश शाळांमधील स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता नसल्याने प्रचंड दुर्गंधीमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत.

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 71 तर शहरात नगरपालिकेच्या 16 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे मिळतात. या शाळांमधील मुला-मुलींसाठी शासनाच्या आदेशानुसार स्वतंत्र स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात आले आहे. स्वच्छतागृह बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 70 हजार रुपये तर सर्व शिक्षा अभियानांतर्गत 55 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, शाळेच्या आवारात बांधकाम करण्यात आलेल्या स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता व देखभाल होत नाही. जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांना संरक्षण भिंत नसल्याने रात्री -अपरात्री काही नागरिक शौचालयाचा खुलेआम वापर करतात.

तसेच मुलींच्या स्वच्छतागृहात सुरक्षेच्यादृष्टीने कोणत्याही उपाययोजना नाहीत. परिणामी काही टवाळखोर मुले शाळेच्या स्वच्छतागृहाचा गैरवापर करतात. नियमित स्वच्छता होत नसल्याने सुटणार्‍या दुर्गंधीमुळे शालेय आवारात नाक धरून चालावे लागते, अशी स्थिती आहे. तर काही ठिकाणी पाण्याअभावी स्वच्छतागृहांचा वापर नसल्याने त्यांना टाळे लागले आहे. पालिकेच्या स्वच्छतागृहाची वेगळी अवस्था नाही. यामुळे शिक्षकवर्गासह विद्यार्थी त्रस्त आहेत.

फक्त दोन शाळांचा ठरला अपवाद
शहरातील झेडटीएस भागातील जिल्हा परिषद शाळेत स्वच्छतागृह नाही. यामुळे विद्यार्थ्यांना बाजूला असलेल्या अंगणवाडीतील स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो. तालुक्यातील वाघूर धरण येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात जागा नाही. केवळ दोन ठिकाणी ही अपवादात्मक परिस्थिती आहे.
-पी.एन.ठाकरे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, भुसावळ

पटसंख्या महत्त्वाची
विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शाळेच्या आवारात स्वच्छतागृह बांधकाम करण्याचे आदेश आहेत. यानुसार सन 2011-2012 मध्ये सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून 10 तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 8 अशा एकूण 18 स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात आले आहे. आरोग्यासाठी या स्वच्छतागृहांचा वापर व्हावा, यासाठीच हे काम करण्यात आले आहे.
-अविनाश येवले, कनिष्ठ अभियंता, पंचायत समिती, भुसावळ