आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिमुकल्यांच्या शस्त्रक्रियेसाठी शाळकरी मुलांची आर्थिक मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जळगाव- समाजामध्ये आजही सामाजिक जाणिवा टिकून आहेत, याची कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रचिती येते. सात वर्षीय चिमुकल्या दोस्ताच्या शस्त्रक्रियेसाठी सेंट टेरेसा हायस्कूलमधील बच्चे कंपनीने आर्थिक मदतीचा हात दिला. त्यांनी तब्बल 80 हजार रुपये जमवून दिले.

सेंट टेरेसा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिलीत शिकणारा महेश सुभाष चौधरी (वय 7) आणि त्याचा सात महिन्यांचा भाऊ अमित चौधरी या दोघांच्या हृदयाला जन्मापासून छिद्र होते. तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले, की बहुतांश मुलांना या प्रकारची व्याधी असते. कालांतराने ती भरून निघते. मात्र, याउलट महेशच्या हृदयाचे तीन एमएमचे छिद्र 17 एमएमपर्यंत वाढले होते. त्याच्या भावाचीही हीच परिस्थिती होती. सुभाष चौधरी यांना दोघांच्या शस्त्रक्रियेसाठी पैसा उभा करायचा कसा, असा प्रश्न पडला. दोघांना सहा ते सात लाख रुपये शस्त्रक्रियेसाठी लागतील, असा अंदाज डॉक्टरांनी दिला होता. कोर्ट चौकात असलेल्या पानटपरीवर उदरनिर्वाह असलेल्या सुभाष चौधरी यांनी आर्थिक मदतीसाठी सामाजिक संस्थांकडे पाठपुरावा केला. त्यास सकारात्मक प्रतिसाद तर मिळालाच, पण अनेक मित्रांचे हात मदतीला पुढे आले. एवढेच नव्हे, तर सेंट टेरेसा शाळेतील चिमुकल्यांनीही सढळ हाताने मदत केली.

सामाजिक कार्यामुळे मदत
दोघांवर पुणे येथील हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली. जुन्या जळगावातील नवजवान मित्र मंडळाचा संचालक असल्यामुळे अनेकांशी परिचय होता आणि सामाजिक कार्यातही सहभाग असल्यामुळे माझ्या मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी मदत झाली. त्यामुळे आजही समाजसेवा करणार्‍यांची संख्या कमी झालेली नाही, असे चौधरी यांनी सांगितले.

मुलांच्या मदतीने गहिवरले पिता
महेशच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची गरज आहे, असे आवाहन शाळेत करण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी तब्बल 80 हजार रुपयांची मोठी रक्कम जमा करून दिली आणि दातृत्व भावनेचा आदर्श बच्च्े कंपनीने सर्वांसमोर ठेवला. विशेष म्हणजे संकलित केलेले पैसे एका चिमुकल्या विद्यार्थ्याच्या हातून देण्यात आले. मुलांनी केलेली मदत स्वीकारताना मला गहिवरून आले. डोळे भरून आले, अशी भावना अमित व महेशचे वडील सुभाष चौधरी यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली.