आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयीन युवतीच्या जीवावरचे बोटांवर निभावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दुचाकीने महाविद्यालयात जात असताना मागून येणारा ट्रक अचानक अंगावर आल्यामुळे स्वत:चा हात पुढे करणार्‍या सुचिता सचिन पाटील (वय 17) हिच्या उजव्या हाताची तीन बोटे तुटली. ही घटना शनिवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास दूध फेडरेशन परिसरातील गॅस गोडाऊन समोर घडली.

सुचिता ही तिची चुलत बहीण स्वीटी पाटील हिच्यासोबत दुचाकीने (एमएच-19, बीके-2656) मूजे महाविद्यालयात जात होती. सुचिता दुचाकीच्या मागच्या सीटवर बसली होती. त्यांच्या मागून येणारा ट्रक (क्र.एमएच-19, झेड-1264) ओव्हरटेक करीत होता. ट्रकच्या समोर रिक्षा आल्यामुळे ओव्हरटेक शक्य झाले नाही. अशा परिस्थिती ट्रकचालकाने डावीकडे मोठे वळण घेतल्याने ट्रक दुचाकीच्या अगदी जवळ आला. दुचाकी ट्रकच्या मागच्या चाकाजवळ आल्यामुळे सुचिताचा जीव घाबरला. स्वत:सह स्वीटीला वाचविण्यासाठी तिने उजवा हात ट्रकच्या मागच्या बाजूला असलेल्या पट्टीजवळ नेला. ट्रकला हात लावल्यानंतर आपण रस्त्याच्या कडेला फेकले जाऊ अशा विचाराने सुचिताने पट्टीला हात लावला. मात्र घडले उलटेच. त्याच पट्टीत तिची बोटे अडकली. ट्रक वेगाने पुढे निघून गेला. आणि तिची तीन बोटे शरीरापासून वेगळी झाली. जीवाच्या आकांताने सुचिताने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी ट्रकचा पाठलाग केला. घटनास्थळावर सुचिताची बोटे पडली होती. रक्तबंबाळ झालेल्या सुचिताला नागरिकांनी सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर घटनास्थळावर पडलेल्या तिच्या बोटांना ताब्यात घेतले. थोड्याच अंतरावर चालक भरत अंबादास पारधक याने ट्रक उभा केला आणि तो शहर पोलिसांना शरण आला. अपघातानंतर सु़िचताचे कुटुंबीय उपचारासाठी तिला नाशिक येथे घेऊन गेले. तेथे सोपान हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिसांनी प्राथमिक नोंद केली आहे.

. तर सर्जरी होते
अपघात झाल्यानंतर एखादा अवयव शरीरापासून वेगळा झाला असेल तर तो स्वच्छ करून प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून बर्फात ठेवून किमान सहा ते सात तासाच्या आत पेशंटसह रुग्णालयात दाखल करावे. मायक्रोस्कोपच्या सहाय्याने रक्तवाहिनी जोडून यशस्वी शस्त्रक्रिया करता येते. डॉ. अमित वराडे, हॅण्ड मायक्रोव्हर्सिक्ल्युलर सर्जन