आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कॅरीऑन’लागू न केल्याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित, मनसे, अभाविपची कुलगुरूंशी चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अ भियांत्रिकीच्या विविध शाखांच्या विद्यार्थ्यांना ‘कॅरीऑन’ न मिळाल्याने अनेक विद्यार्थी पुढील वर्षाच्या प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. त्यासाठी कॅरीऑन प्रथम वर्षापासून ते शेवटच्या वर्षापर्यंत लागू करण्याची मागणी कुलगुरू सुधीर मेश्राम यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीसह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने लक्ष वेधले आहे.

उत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकीच्या विविध शाखांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील बरेच विद्यार्थी कॅरीऑन न मिळाल्याने पुढील वर्षासाठी प्रवेश घेण्यापासून वंचित राहणार आहेत. दुसरीकडे विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मर्यादा कमी केली आहे. प्रशिक्षित प्राध्यापक नसल्याच्या कारणावरून विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी ओरडही केली होती; मात्र त्यास विद्यापीठाने दाद दिली नाही. वरील दोन्ही प्रमुख मागण्यांकडे या संघटनांनी लक्ष वेधले आहे.

पहिल्या वर्षापासून कॅरीऑन लागू करा
तृतीय वर्षात मोजकेच विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यांना नवीन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा लागत आहे. त्यांचे वार्षिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना कॅरीऑन देण्यात यावे. कॅरीऑनमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा तसेच तोंडी परीक्षांचा समावेश करावा, या मागणीसोबत जुन्या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारा ‘ऐच्छिक 5’ हा नियम सीजीपीए विद्यार्थ्यांना देखील लागू करावा, तसेच उत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठाला खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात यावे, या मागण्यांसाठी कुलगुरू सुधीर मेश्राम यांच्याशी मनसेच्या पदाधिका-यांनी चर्चा केली. या वेळी रवींद्र नेरपगारे, जयेश विसपुते, ओजस जैन, जय सोनवणे, कुलदीप पाटील, योगेश नेहेते, संदीप पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

पदव्युत्तरच्या जागा वाढवा
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा कमी केल्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. यासंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी कुलगुरू सुधीर मेश्राम यांची भेट घेऊन चर्चा केली. उत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठाने रिक्त प्राध्यापकांच्या जागा भरून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. तीन महिन्यांत ही कार्यवाही पूर्ण न करणा-या महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. यावर कुलगुरू मेश्राम यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांसंदर्भातील परिपत्रक जारी करू, असे आश्वासन दिले. या वेळी प्रदेशमंत्री शैलेंद्र दळवी, नंदकुमार वितलगावकर, दिनेश चव्हाण, मयूर भदाणे आदी उपस्थित होते.