आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student School Auto Rickshaw Transport Issue Dhule

विद्यार्थ्यांची रिक्षांमधील कोंबाकोंबी थांबणार कधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातील कराचीवाला खुंट परिसरात काही दिवसांपूर्वी अपघातात खूश जैन या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या घटनेनंतर पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षांमध्ये केवळ सहा विद्यार्थी बसविण्याच्या सूचना दिल्या ; परंतु या सूचनांकडे दुर्लक्ष करून विद्यार्थी वाहतूक करणार्‍या रिक्षांमध्ये राजरोसपणे दहा ते पंधरा विद्यार्थी कोंबण्यात येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात खूश सारख्या निरपराध मुलाचा मृत्यूची घटना नाकारता येत नाही.

खूश जैनचा अपघात घडल्यानंतर मागील काही दिवसांपासून शहरातील अवैध विद्यार्थी वाहतुकीच्या प्रश्नावर मोठय़ा प्रमाणावर सभा, बैठका सुरू आहेत. तसेच पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. याशिवाय रिक्षाचालकांच्या बैठकाही घेण्यात येत आहेत. हे सारे सुरू असताना विद्यार्थी वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकांनी विद्यार्थी कोंबण्याची पद्धत जैसे थे सुरू ठेवली आहे. विद्यार्थी वाहतुकीसंदर्भात असलेल्या 2011च्या शासन आदेशानुसार रिक्षांमध्ये फक्त सहाच विद्यार्थी बसविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याबाबत पोलिस प्रशासनानेदेखील काही दिवसांपासून रिक्षाचालकांना वारंवार आवाहन केलेले आहे. मात्र, असे असताना रिक्षाचालकांची मुजोरी जैसे थे आहे. त्यामुळे विद्यार्थी वाहतूकही असुरक्षितच आहे. प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

लाइव्ह रिपोर्ट
शहरात सकाळी अकरा वाजता शाळा भरताना ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी शैक्षणिक चौकात रिक्षांची पाहणी केली. या वेळी जयहिंद विद्यालय, कमलाबाई कन्या शाळा, जिजामाता विद्यालय, महाराणा प्रताप विद्यालय, महाजन हायस्कूल, नॉर्थ पॉइंट, चावरा इंग्लिश मीडियम स्कूल, कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूल या शाळांमध्ये विद्यार्थी घेऊन जाणार्‍या रिक्षांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक विद्यार्थी बसलेले आढळले. प्रत्येक रिक्षांत दहा व त्यापेक्षा अधिक विद्यार्थी बसविले होते. जयहिंद शाळेच्या एका रिक्षात तब्बल 17 विद्यार्थी बसवण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नियमांची केली जाते खुलेआम पायमल्ली
शासनाने विद्यार्थी वाहतुकीबाबत 2011मध्ये शासन आदेश पारित केला. मात्र, त्यासंदर्भात 2013च्या जूनपर्यंत कोणतीच सक्ती अथवा अंमलबजावणी झाली नाही. खूश जैन या बालकाच्या मृत्यूनंतर रिक्षांवर कारवाई सुरू झाल्यानंतर रिक्षाचालकांनी संप पुकारला. तर दुसरीकडे काही रिक्षाचालकांनी रिक्षाच्या दोन्ही बाजूला जाळ्या, कॅरी बसविल्या. मात्र, इतर रिक्षाचालकांकडून आजही नेहमीप्रमाणे नियमांची खुलेआम पायमल्ली सुरू आहे.