आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालवैज्ञानिकांचे थक्क करणारे संशोधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - नवी दिल्ली येथील विज्ञान-तंत्रज्ञान विभाग, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात बालवैज्ञानिकांनी वीज, पाणी, पवनऊर्जा आदी विषयांवर संशोधन करून थक्क करणारे प्रयोग सादर केले आहेत. या प्रदर्शनाचा उद्या बुधवारी दुपारी तीन वाजता समारोप होईल. या वेळी शिक्षण उपसंचालक तुकाराम सुपे अध्यक्षस्थानी असतील. जयहिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. पवार, शिक्षणाधिकारी डी. एल. साळुंखे, प्रभारी शिक्षणाधिकारी एम. आर. कुवर, प्रकाश आंधळे, प्राचार्य ए. डी. सोनार, उपशिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी, एस. डी. मोरे, विज्ञान पर्यवेक्षक एम. जी. सोनवणे, अधीक्षक कपिल शेख, विजय बोरसे, डी. के. पवार उपस्थित असतील.

शिक्षकांना अध्यापनात मदत करणारे सूर्यमालेवर उपकरण

सूर्यमाला व त्यातील ग्रहांसंदर्भात शिक्षकांना अध्यापनासाठी फायदेशीर ठरेल, अशा सूर्यमालेची प्रतिकृती शिरपूर येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी प्रेरणा दिनकर चौधरीने सादर केली आहे. या प्रयोगाद्वारे तिने सूर्य आणि त्याच्या सभोवताली असलेल्या ग्रहमालेच्या कार्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सूर्याभावेती सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनि, युरेनस, नेपच्यून हे आठ ग्रह परिभ्रमण करीत असल्याचे दाखविले आहे.

फिनिक्स मार्स लॅन्डरची निर्मिती

अवकाशात वैज्ञानिकांकडून यान सोडले जाते. त्यानंतर त्या यानामधून मिळणारी माहिती, फोटो कसे निघतात याचे कुतूहल प्रत्येकाला असते. त्यावर शिंदखेडा येथील स्वामी सर्मथ विद्यालयातील दिनेश गुलाब कुवर याने फिनिक्स मार्स लॅन्डर-2007 ची प्रतिकृती सादर केली आहे. त्याने अवकाशात सोडण्यात येणारे यान, त्यातील कॅमेर्‍यांतून छायाचित्र कसे काढले जाते याची आकर्षक पद्धतीने मांडणी केली आहे.

इंधन निर्मिती

धुळे तालुक्यातील कुंडाणे येथील मो. ता. पाटील माध्यमिक विद्यालयातील नरेश तानाजी भदाणे या विद्यार्थ्याने प्लास्टिकच्या कचर्‍यापासून डिझेल, ऑइलसारखे इंधन तयार करता येऊ शकेल, असे उपकरण तयार केले आहे. हे मॉडेल इंधन तुटवड्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी लाभदायक ठरेल असा, दावा नरेशने केला आहे.

जीओ थर्मल एनर्जी

दोंडाईचा येथील रोटरी स्कूलमधील रुची राजेश कुकरेजाने जीओ थर्मल एनर्जी प्रकल्पाच्या प्रारूपाची मांडणी केली आहे. वाया जाणार्‍या ऊज्रेपासून उपयुक्त ऊर्जा मिळू शकते, असे या विद्यार्थिनीचे म्हणणे आहे. सचित्र उपकरणातून तिने ते सिद्ध केलेले आहे.

अचूक पाऊस मोजणार्‍या पर्जन्यमापकाचा लावला शोध

शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे येथील माध्यमिक शाळेतील यशवंत कांतिलाल साळुंखेने पर्जन्यमापक तयार केले आहे. हे यंत्र तयार करण्यासाठी त्याने टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे. या उपकरणामुळे किती पाऊस झाला याची घरबसल्या माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. या उपकरणाद्वारे दैनंदिन, वार्षिक पावसाचे मापन सहज करता येऊ शकते. यशवंतला हे उपकरण तयार करण्यासाठी शाळेतील विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.