आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटाळ्यात सहभाग नसेल; मात्र मुख्याध्यापकांनीच घातले पांघरून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- तब्बल 29 लाख 56 हजार रुपयांचा गणवेश घोटाळा उघडकीस आल्यानंतर भुसावळ तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्र अक्षरक्ष: हादरले आहे. वर्षभरापासून या घोटाळ्याचा धूर निघत होता. थेट फिर्यादच दाखल झाल्याने आता यातील चेहरे स्पष्ट होत आहेत. फिर्यादीमध्ये गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांचे एकमेव नाव आहे. मात्र, घोटाळ्याची व्याप्ती पाहता एका विशिष्ट साखळीच्या माध्यमातून हे षड्यंत्र यशस्वी झाल्याची शक्यता आहे. औरंगाबाद येथील कथित र्शद्धा विकास महिला मंडळापासून ते गट साधन केंद्र, 77 शाळांमधील मुख्याध्यापकांना याचा जाब विचारणे क्रमप्राप्त आहे.

पंचायत समितीच्या नियंत्रणाखालील आणि गटशिक्षणाधिकारी जबाबदार असलेल्या शिक्षण विभागातून या घोटाळ्याची सुरुवात झाली. मुंबई येथील यंत्रमाग महामंडळाकडून 80 मराठी आणि उर्दू माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळांसाठी गणवेशाचा कापड प्राप्त झाला. मात्र, हा कापड सर्व शिक्षा अभियानाच्या गोडावूनमध्ये न जाता थेट गट साधन केंद्रात गेला. हीच या घोटाळ्याची पहिली कडी होती. यापूर्वीच कापड औरंगाबाद येथील र्शद्धा महिला मंडळाकडे शिलाईसाठी देण्याबाबत वरिष्ठ अनुकूल होते. मात्र, औरंगाबादच्या संस्थेकडे कापड सोपवताना शिलाईचे पैसे देणे आवश्यक होते. येथे घोटाळ्याची मुख्य कडी रचली गेली.

केवळ तोंडी निरोप देवून मुख्याध्यापकांना भुसावळातील गट साधन केंद्रात बोलावण्यात आले. येथे प्रत्येक मुख्याध्यापकांकडून गणवेश कापड आणि शिलाईसाठी, असे प्रत्येकी दोन धनादेश घेण्यात आले. धनादेश स्वीकारण्यासाठी र्शद्धा महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांची गट साधन केंद्रामध्ये खास बडदास्त ठेवण्यात आली. मुख्याध्यापकांनी डोळ्यावर पट्टी बांधून आपल्या स्वाक्षरीचे धनादेश औरंगाबादच्या संस्थेला देताना कापड, शिलाईच्या रकमेबद्दल शहानिशा केली नाही.

या वेळी गांभीर्य दाखवले असते, तर हा घोटाळा झालाच नसता. मात्र, विद्यार्थीहित, शासकीय निधीचा अपव्यय रोखण्यापेक्षा बहुतांश मुख्याध्यापकांनी ‘कातडी बचाव’ धोरण स्वीकारले. केवळ मुख्याध्यापकच नव्हे, तर शिक्षण विभाग आणि मुख्याध्यापकांमधील दुवा असलेले विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांनी घोटाळ्याची बिजे पेरली जात असताना अक्षरक्ष: डोळ्यावर पट्टी बांधली.

कसला आला कळवळा
गोरगरीब-विद्यार्थीहिताचा कळवळा दाखवणारे चेहरे भुसावळात डझनवारी आहेत. मात्र, वर्षभरापूर्वीच गणवेश घोटाळा उघडकीस आल्यावर यापैकी एकालासुद्धा गरिबांची मुले आठवले नाहीत. एकही जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती सदस्याने, याबाबत अधिकार्‍यांना जाब विचारला नाही. अगदी तज्ज्ञ म्हणून मिरवून घेणारे ‘सुटा-बुटातील’ सदस्य सुद्धा आनंदीआनंद असल्यासारखे वागले. जाहीर कार्यक्रम-सभा, व्यासपीठांवरून दाखवायचे वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा भुसावळकरांसमोर आले. अपवाद फक्त आमदार संजय सावकारे यांचा ठरला. त्यांनी मध्यंतरी गणवेश घोटाळ्यातील गफला थेट ग्रामविकास मंत्र्यांपर्यंत पोहोचवला होता.