आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुरड्यांच्या पुस्तकांसाठी लागेल आठवडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पहिली व दुसरीच्या पुस्तकांसाठी बुक डेपोंच्या पायर्‍या झिजवूनही विद्यार्थी, पालकांच्या हातात पुस्तके पडलेली नाहीत. तथापी, पहिलीचे मराठी, इंग्रजी, गणित व दुसरीचे इंग्रजी या विषयांची पुस्तके बाजारात आली आहेत. उर्वरित पुस्तके येण्यासाठी आठवडा लागणार असल्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तवला आहे.

अभ्यासक्रम बदललेल्या इयत्तांची पुस्तके मिळणे विद्यार्थी व पालकांना जिकिरीचे होत आहे. महिनाभरापूर्वी दहावी व बारावीची पुस्तके बाजारात यायला सुरुवात झाली असून, आता कुठे सर्व पुस्तके मिळू लागली आहेत. त्यातही बारावीचे पर्यावरण विषयाचे पुस्तक अजूनही आलेले नाही. त्याचप्रमाणे पहिली आणि दुसरीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचाही घोळ सुरू आहे. पहिलीच्या इंग्रजी माध्यमाचे इंग्रजी, मराठी माध्यमाचे इंग्रजी, मराठी, गणित आणि दुसरीचे मराठी माध्यमाचे गणित हे पुस्तकही आले आहे. उर्वरित पुस्तके आली का? याचा शोध घेण्यासाठी विद्यार्थी व पालक चकरा मारत आहेत. तसेच इतर वर्गांची पुस्तके घेण्यासाठी पालकांची विक्रेत्यांकडे गर्दी होऊ लागली आहे.

पालकांना त्रास
शाळा उघडण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडायला हवी होती; पण आठवडा संपण्यात आला तरी पुस्तके आलेली नाहीत. त्यामुळे पालकांना त्रास सहन करावा लागत आहे. सुबोध नेवे, शारदा बुक डेपो

‘विज्ञान’च्या पुस्तकात धडे वाढले
दहावीच्या ‘विज्ञान-2’ या पुस्तकात यंदा दोन धडे वाढले असून, त्याच्या नवीन प्रतीदेखील छापून आल्या आहेत. यापूर्वी छापलेल्या पुस्तकांसोबत त्या धड्यांची पुरवणी जोडण्यात आली होती. याशिवाय दहावीच्या भूगोलच्या पुस्तकातील नकाशात झालेल्या चुकांची दुरुस्ती स्टिकर्सच्या साहय़ाने केली आहे. चुका लक्षात येण्यापूर्वी पुस्तकांवर पर्याय म्हणून स्टिकर्स पुरवण्यात येणार आहे.

मराठीचे पुस्तक शनिवारी येणार
पहिली आणि दुसरीच्या पुस्तकांच्या छपाईचे काम सुरू असून, शनिवारी दुसरीचे मराठी व पहिलीच्या इंग्रजी माध्यमाचे इंग्रजीचे पुस्तक बाजारात येणार आहे. येथील विद्यार्थ्यांना ही पुस्तके रविवारी उपलब्ध होतील, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. तसेच उर्वरित पुस्तकांसाठी अजून आठवडाभराचा अवधी लागण्याची शक्यताही वर्तवण्यात आली.