आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिकमार्क करणे गैरप्रकार; भरारी पथकाचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामान्य ज्ञान विषयाच्या परिक्षेवेळी बेंडाळे महाविद्यालयातील दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या २३ विद्यार्थीनींवर कॉपी केल्याचा ठपका भरारी पथकाने ठेवला असून या विद्यार्थींनीनी प्रश्नपत्रिकेतील उत्तरांच्या पर्यायांवर खूण केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या भरारी पथकाने अचानक केलेल्या धडक कारवाईमुळे महाविद्यालयीन वर्तुळात खळबळ उडाली. प्रश्नपत्रिकेवर खूण करणे अाक्षेपार्ह असून हा कॉपीचा प्रकार असल्याचे भरारी पथकाने सांगितले तर कॉपी केलेली नसतानादेखील भरारी पथकाने अन्याय केल्याची भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केली आहे.
बेंडाळे महाविद्यालयात रविवारी दुपारी ते यावेळेत सामान्यज्ञान विषयाचा पेपर घेण्यात आला. द्वितीय, तृतीय वर्ष कला, वाणिज्य विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनींनी हा पेपर दिला. यात आठ वर्गखोल्यांमध्ये सुरू असलेल्या या पेपरच्या वेळी मू.जे. महाविद्यालयातील चार प्राध्यापकांच्या भरारी पथकाने एकाच वेळी तपासणी सुरू केली. यात काही मुलींनी प्रश्नपत्रिकेवरील उत्तरांच्या पर्यायांवर खुण केल्याचे आढळून आले. त्यामुळे सर्व खोल्यांमधील २३ मुलींवर कॉपी केस करण्यात आली. कॉपी केस करण्यात अालेल्या मुली चांगल्याच धास्तावलेल्या होत्या. तर बेंडाळे महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थिनींची बाजू घेत चूक नसताना अन्याय झाल्याचे मत व्यक्त केले आहे. कॉपी केस झालेल्या काही परीक्षार्थी विद्यार्थिनी या तृतीय वर्षाचे सर्व विषय उत्तीर्ण आहेत. केवळ सामान्यज्ञान विषयामुळे त्यांना पदवी मिळू शकली नाही. मूजे महाविद्यालयातील डॉ. आर.आर.अत्तरदे हे या भरारी पथकाचे प्रमुख होते. त्यांच्यासह डॉ. एस.बी.जोशी, डॉ. कल्पना नंदनवार आणि प्रा. ए.जे.चौधरी यांचा पथकात समावेश हाेता.
कारवाईनंतर एकमेकांशी चर्चा करताना विद्यार्थिनी.

काय म्हणतात पथकप्रमुख डॉ. अत्तरदे
{आयडेंटिफिकेशन मार्क करणे हे गैरप्रकारात मोडते.
{कारवाई करण्यात आलेल्या विद्यार्थिनींनी प्रश्नपत्रिकेवरील उत्तरांच्या पर्यायांजवळ पेन्सिल, पेनाने टिंब केले होते. ते आक्षेप घेण्यासारखे असून कॉपी असल्याचे मानले जाते.
{प्रश्नपत्रिकेवरील कोरा भाग गणिताचे प्रश्न सोडवण्यासाठी वापरला जाऊ शकतो. टिकमार्क करणे हा गैरप्रकार आहे. त्यातून उत्तराची ओळख होते.
{उत्तरपत्रिकेवर एकदा चुकीचे उत्तर निवडले तरी फुली मारून दुसरे उत्तर निवडण्याची संधी दिलेली असते. उत्तर लक्षात राहण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर टिकमार्क करता येत नाही.

काय म्हणतात काॅपी केस झालेल्या मुली
{प्रश्नपत्रिकेवर खुण करू नये, अशी लेखी सूचना दिलेली नाही.
{प्रश्नपत्रिकेवरील सूचनेनुसार काही कच्चे काम करायचे असल्याचे या पुस्तिकेवरच करा, उत्तरपत्रिकेवर करू नका, असे म्हटले आहे.
{प्रश्नपत्रिकेवर केलेली खुण स्वत:च्या एकाग्रतेसाठी केल्या होत्या. सहा वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका असल्यामुळे मागे, पुढे बसलेल्या परीक्षार्थींना उत्तर दाखवण्याचा प्रश्नच येत नाही.
{प्रश्नपत्रिकेवर केवळ खुण केली आहे. त्या शिवाय काहीच लिहलेले नाही. भरारी पथकाने आमच्यावर अन्याय केला .
पुढे काय?
पथकाच्या म्हणण्याप्रमाणे हा कॉपीचाच प्रकार आहे. त्यामुळे पथकाने कॉपीसदृश भागावर लाल पेनाने राऊंड करून त्या उत्तरपत्रिकांची वेगळी नोंद घेतली आहे. या उत्तरपत्रिका उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात वेगळ्या पाठवण्यात येतील. त्यानंतर गैरप्रकार समितीसमोर सुनावणी करून आवश्यकता वाटल्यास संबंधित विद्यार्थिनींना त्यांची बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात येईल. चौकशी आटोपल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल. दरम्यान, जर विद्यार्थी दोषी आढळून आले, तर तीन वर्षांसाठी डिबार किंवा पुढच्या सत्राला हा पेपर पुन्हा देणे किंवा आहे तोच पेपर पुन्हा तपासण्याचा निर्णय गैरप्रकार समिती घेऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...