आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Students Kidnapping News In Marathi, Crime Divya Marathi, Jalgaon

विद्यार्थ्यांनीच हाणून पाडला विद्यार्थ्‍यांच्या अपहरणाचा डाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - चार दिवसांपासून पाळत ठेवून शाळकरी विद्यार्थ्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्ना असलेल्या पाच जणांचा डाव सोमवारी मेहरूणमधील विद्यार्थ्यांनीच उधळला. यात अपहरण करणारे मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. तर दुसरीकडे या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


मेहरूण परिसरातील या.दे.पाटील शाळेतील चंदन पाटील, हेमंत पाटील, तेजस महाजन, तेजस पवार, भावेश वाघ आणि चेतन माळी (सर्व रा. मेहरूण) या विद्यार्थ्यांसोबत हा थरार झाला. हे सर्व विद्यार्थी या. दे. पाटील शाळेत पाचव्या तसेच सहाव्या वर्गात आहेत. सकाळी 9 वाजता शाळा सुटल्यानंतर घराकडे जात असताना रस्त्यात एका अनोळखी कालीपिली वाहनातील पाच जणांनी या पैकी चंदन पाटील या विद्यार्थ्याला पळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विद्यार्थ्यांनी गाडीचा नंबर घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे अपहरणकर्त्यांचा प्रयत्न फसला आणि त्यांना पळ काढावा लागला, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.


भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ही घटना पोलिसांनी गांभीर्याने घेऊन त्वरित आरोपींना शोध घ्यावा व यापुढे अशा घडणार नाहीत, यासाठी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


पोलिसांकडून चौकशी
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटना घडल्यानंतर अपहरणकर्ते मेहरूणमार्गे औरंगाबाद महामार्गाकडे गेले होते. उपअधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी घटनास्थळी भेट देऊन काही नागरिक व शाळेच्या कर्मचार्‍यांशी चर्चा केली. मात्र, संबंधित घटनेबद्दल जास्त माहिती मिळू शकली नव्हती. दरम्यान, पोलिसांनी दिवसभर शहरातून बाहेर पडणार्‍या मार्गांवर नाकाबंदी केली होती.

गाडीतला ‘तो’ मुलगा कोण?
या वाहनात एक शाळकरी मुलगा होता. या मुलाने पाटील शाळेतील विद्यार्थ्यांना गाडीकडे येऊ नका, असा इशारा केला होता. गाडीत 35 ते 40 वर्षे वयोगटातील पाच व्यक्ती तोंडावर रुमाल बांधून बसल्या होत्या. त्यांनी मुलांना गाठून गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला. एका मुलाने अपहरण करणार्‍याच्या हाताला झटका देत सुटका केली, तर इतर दोघांनी गाडीचा नंबर बघण्यासाठी धावपळ केली. याच वेळी अपहरणकर्ते एमआयडीसीकडे पळाले. दरम्यान, गाडीवर एमएच 18 एवढाच नंबर विद्यार्थी पाहू शकले आहेत.