आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी बनले विक्रेते; विवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश स्कूलचा अनोखा उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शालेय जीवनात विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळणेही आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन विवेकानंद प्रतिष्ठान संचलित इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शुक्रवारी ‘स्टुडंट्स वल्र्ड’ हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी दुकानदार बनून विविध वस्तू विकल्या. त्यासाठी शाळेत एक दुकान उघडण्यात आले असून, तेथे विद्यार्थी विविध वस्तूंची विक्री करणार आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य अनिल राव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी या दुकानातून पोस्टर्स खरेदी केले. या वेळी डीएड महाविद्यालयाच्या प्राचार्या संध्या देशमुख, दिनेश ठाकरे, मुख्याध्यापिका योगिता शिंपी उपस्थित होत्या.
असा आहे उपक्रम
‘स्टुडंट्स वल्र्ड’ उपक्रमांतर्गत सुरू केलेल्या दुकानात विद्यार्थ्यांना कला विषयाचे जे शालेय साहित्य लागते ते ठेवण्यात आले असून, दर बुधवारी अर्धा तास हे दुकान सुरू राहणार आहे. पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी वेगवेगळ्या दिवशी दुकानात बसून विविध साहित्याची विक्री करणार आहेत. शनिवार हा खाऊचा वार असतो. त्यामुळे मुलांना पौष्टिक आहार मिळावा याकरिता या दुकानात फळेदेखील ठेवण्यात येणार असून, ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
प्रॅक्टिकल ज्ञान मिळावे
विद्यार्थ्यांना बाहेर काही आणायला पाठवले, तर त्यांना हिशोब करताना अडचणी येतात. ते गणित सोडवू शकतात; पण व्यवहार करणे त्यांना जमत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गणिताचा अभ्यास व्हावा व त्यांना व्यावहारिक ज्ञानही मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. कारण प्रॅक्टिकल नॉलेजही महत्त्वाचे आहे. या ठिकाणी ते स्वत: पैसे देतील, परत घेतील व व्यवहार करतील. - योगिता शिंपी, मुख्याध्यापिका