आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिनाभर राबवणार ‘एकच ध्यास, करू अभ्यास’ उपक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - साधारणत: महिना-दीड महिना परीक्षांचा काळ असल्याने मुलांच्या अभ्यासाविषयी पालकांना चिंता लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुलांमध्ये अभ्यासाची गोडी वाढावी व पालकांनी मुलांचा अभ्यास घ्यावा याबाबत उद्बोधन केले जाणार आहे. त्यासाठी शासनातर्फे ‘एकच ध्यास, करू अभ्यास’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.


दहावी-बारावीसोबत शालेय व अन्य विविध शाखांच्या परीक्षा साधारणत: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होतात आणि त्या थेट एप्रिलपर्यंत चालतात. त्यामुळे आगामी दोन महिने परीक्षांचे असून, या काळात मुलांनी चांगला अभ्यास करावा आणि पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, यासंदर्भात शिक्षण विभागातर्फे मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे नियोजन केले जाणार आहे. जबाबदारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागावर सोपवली आहे. त्याअंतर्गत शिवजयंतीपासून ते आंबेडकर जयंतीपर्यंत उद्बोधनपर उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यात मुलांनी अभ्यास कसा करावा, याविषयीदेखील मार्गदर्शन केले जाणार आहे.


दोन तास बंद ठेवा टीव्ही
परीक्षेच्या काळात रात्री दोन तास टीव्ही बंद ठेवून पालकांनी मुलांचा अभ्यास घ्यावा, याबाबत पालकांसाठीही शाळांमध्ये उद्बोधन वर्गांचे आयोजन केले जाणार आहे. त्यात मुलांच्या अभ्यासाकडे पालकांनी लक्ष द्यावे, त्यांच्याकडून अभ्यास करवून घ्यावा. त्याचबरोबर ग्रामीण भागात शिक्षक घरोघरी जाऊन अभ्यासाबाबत पडताळणी करणार आहेत. असा प्रयोग महिनाभर केल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासात नक्कीच प्रगती होईल असा विश्वास शासनाला आहे.

अभ्यासाची गोडी
मुलांमध्ये अभ्यासाविषयी जागरूकता वाढावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच येत्या दोन दिवसात याबाबतचा नियोजन आराखडा मिळणार आहे. याबाबत सर्वच शाळांतील मुख्याध्यापकांना सूचना देण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. शिवाजी पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग


विद्यार्थ्यांकडून गिरवणार धडे
राष्ट्रीय गीते, सामान्य ज्ञान पूर्वतयारी यासह विद्यार्थ्यांना इंग्रजीची छोटी-छोटी वाक्ये देऊन ती म्हणून घेण्यासोबत त्यांचा उपयोग व्यवहारात कसा करता येईल, याचे धडे विद्यार्थ्यांकडून गिरवून घेतले जाणार आहेत. इयत्ता पहिलीपासून ते बारावीच्या मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जाणार असून, ग्रामीण भागात रात्री 8 ते 10 या वेळेत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.