आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचार फेरी व कॉर्नर सभांचा धडाका, आम्ही कसे उजवे? यावर दिला जातोय भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव शहर मतदारसंघात १७ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत पाच उमेदवारांमध्ये होणार आहे. निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवार जोरदार तयारी करताना दिसत आहे. त्यानुसार सध्या उमेदवारांचा प्रचार वेगात सुरू असून मतदारांच्या गाठीभेटींना प्राधान्य दिले जात आहे.
प्रचारात शहराचा विकास व भ्रष्टाचार मुक्त कारभारावर सर्वांचाच भर आहे. आतापर्यंत रखडलेली कामे, एमआयडीसीचा प्रश्न, रोजगाराचा मुद्दा, असे प्रचाराचे विषय आहेत. स्वच्छ व चारित्र्यवान प्रतिमेसोबत विकास करू शकलो नाही तर पुन्हा मत मागायला येणार नाही, असाही दावा उमेदवारांकडून केला जातोय.

भाजप : पालिकेतील भ्रष्टाचारावर अधिक भर
भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांच्या प्रचारात महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर अधिक भर आहे. शहराचा विकास करण्याचे नियोजन आहे. तसेच शहरातील काही वर्षांतील खुटलेली विकासाची गती यावर भर दिला जातोय. औद्योगिक विकासाच्या माध्यमातून रोजगार वाढीला प्राधान्य, मनपाला कर्जमुक्त करण्याचा ध्यास, केंद्राकडून शहराच्या विकासासाठी निधी आणणार, रखडलेली विकास कामे केंद्रातील सरकारच्या माध्यमातून मंजूर करवून आणणार असल्याचे मुद्दे आहेत.

राष्ट्रवादी : जनतेच्या संपर्कात राहण्याचे आश्वासन
राष्ट्रवादीचे उमेदवार मनोज चौधरी यांच्या प्रचारात आमदार झाल्यानंतर पुढचे पाच वर्षे जनतेसाठी कुठेही केव्हाही संपर्कात राहण्याचे आश्वासन दिले जातेय. विद्यार्थ्यांच्या संघटनांमध्ये केलेल्या कामामुळे युवकांच्या समस्यांची जाण आहे. राष्ट्रवादी कार्यालयात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तीन वर्षांपासून अभ्यासिका सुरू, त्यात आणखी वाढ करणार. ३५ वर्षांत विद्यमान आमदाराने काहीच विकास केला नाही. त्यामुळे आपण निवडून आल्यास काहीच केले नाही तर पुन्हा मते मागणार नाही, असे चौधरींचे मुद्दे आहेत.

शिवसेना : स्थैर्य, सुरक्षितता, सर्वांगिण प्रगती
शिवसेनेचे उमेदवार सुरेश जैन यांच्या प्रचारात स्थैर्य, सुरक्षितता, सर्वांगिण प्रगतीसाठी मत देण्याचे आवाहन केले जातेय. कर्तृत्ववान, दातृत्ववान, चारित्र्यवान नेतृत्व अशी प्रतिमा मांडली जातेय. केंद्राची आजची राजीव आवास योजना २० वर्षांपूर्वी सुरेश जैन यांनी शहरात राबवल्याचे सांगत विकासाची दृष्टी असलेला उमेदवार असल्याचे सांगितले जातेय. शहरातील व्यापारी संकुलातून व्यापार व रोजगार दिल्याचा दावा तसेच वाघूर धरण पूर्ण होण्यापूर्वी केलेली पाइप लाइन यावरून नियोजनाचा मुद्दा मांडला जातोय.

मनसे : भ्रष्टाचाराचे उच्चाटन, युवकांसाठी रोजगार
मनसेचे उमेदवार ललित कोल्हे यांच्या प्रचारात स्थैर्य, भ्रष्टाचाराचे उच्चाटन, युवकांसाठी रोजगारासाठी मत देण्याचे आवाहन केले जातेय. कर्तृत्ववान युवा नेतृत्व ही प्रतिमा मांडली जातेय. राज ठाकरे यांनी मांडलेल्या राज्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंटच्या आधारे विकासाचा मुद्दा मांडला जातोय. त्यासोबतच जळगावात गेल्या २५ वर्षांत झालेल्या भ्रष्टाचाराने मतदारसंघाची झालेली दुरवस्था मतदारांसमोर मांडली जात आहे. भाजपच्या काळात लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या भ्रष्टाचाराचीही आठवण मनसेकडून प्रचारात दिली जात आहे.

काँग्रेस : अडीच वर्षांत विकासावर झालेला परिणाम
कॉँग्रेसचे उमेदवार डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या प्रचारात विद्यमान आमदारांच्या कारागृहातील अडीच वर्षे गेल्याने विकासावर झालेला परिणामाचा मुद्दा मांडला जातोय. त्याचबरोबर शहरातील मूलभूत सुविधांपासून वंचित न राहण्यासाठी कॉँग्रेस योग्य पर्याय असल्याचे सांगितले जातेय. राज्यात झालेला भ्रष्टाचार हा राष्ट्रवीदाने केल्याचेही सांगितले जात आहे. सुरक्षित जीवन जगण्यासाठी महामार्गाला लागून समांतर रस्ते, उड्डाणपूल तयार करणे, दवाखान्यामध्ये चांगली आरोग्य सुविधा देणे, शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण हे महत्त्वाचे मुद्दे आहेत.