आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनात वापरलेले हत्यार उपनिरीक्षकांनी ओळखले, पुराव्यावर युक्तिवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; नगरसेवक विनायक सोनवणे खून प्रकरणातील साक्षीदार (क्रमांक २४) पोलिस उपनिरीक्षक जमील शेख यांनी शनिवारी झालेल्या सुनावणीत आरोपी अन् खुनात वापरलेले हत्यार ओळखले. या प्रकरणात प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. ए. लव्हेकर यांच्या न्यायालयात सरकारतर्फे अॅड. गोपाळ जळमकर यांनी शनिवारी १९ ते २८ साक्षीदारांच्या पुराव्यावर युक्तिवाद केला.

सोनवणे खून प्रकरणातील साक्षीदार पोलिस उपनिरीक्षक शेख यांनी १८ डिसेंबर २०१२ ला दुपारी १.१० वाजेच्या सुमारास दोन व्यक्ती रक्ताने माखलेले कपडे, हत्यारासह जिल्हापेठ पोलिस ठाण्यात हजर झाले होते. त्यांनी मनियार लॉ कॉलेजजवळ विनायक सोनवणेचा खून केल्याने हजर होण्यासाठी आल्याचे सांगितले होते. त्या वेळी त्यांनी स्वत:ची नावे राजहंस ऊर्फ नाना सुकदेव सूर्यवंशी आणि पवन राजहंस सूर्यवंशी असे सांगितली. घटनास्थळावरील रक्ताने माखलेली माती, केस, चप्पल, दुचाकी, वुलनची टोपी याचा पंचनामा केल्याचे शेख यांनी सांगितले. शनिवारी शेख यांना अॅड. जळमकर यांनी आरोपी आणि हत्यार दाखविले असता ते त्यांनी ओळखले. हा पुरावा आरोपींनी खून केल्याचे सिद्ध करत असल्याचा युक्तिवाद अॅड. जळमकर यांनी केला.

या प्रकरणातील साक्षीदार वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक पाटील यांच्या साक्षीत त्यांनी १८ डिसेंबर २०१२ ला सायंकाळी ६.१५ वाजता आरोपींच्या वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आले होते. त्या वेळी राजहंस याच्या चेहऱ्यावर नाकाच्या उजव्या बाजूला आणि डोक्याच्या मागील भागात जखम झाली होती. साक्षीदार नीलेश भोळे आणि नितीन पाटील यांच्या साक्षीत सोनवणे यांना वाचवण्यासाठी राजहंस याला बुक्का मारल्याने खाली पडला होता. त्यातच त्याला जखम झाल्याचा युक्तिवाद अॅड. जळमकर यांनी केला. तर दुसरा आरोपी पवन याच्या तळहाताला जखमा होत्या. त्यात काही जखमा धारदार हत्याराने तर काही टणक वस्तूने झाल्याचे डॉ. पाटील यांनी साक्षीत म्हटले होते. त्यामुळे चाकूच्या पुढील धारदार भागाने आणि मागच्या टणक भागाने जखमा झाल्याचे सिद्ध हाेत असल्याचे अॅड. जळमकर यांनी सांगितले.

अमरचा प्रत्यक्ष सहभाग
याप्रकरणातील तिसरा आरोपी अमर सोनवणे याचा खुनात प्रत्यक्ष सहभाग असल्याचा युक्तिवाद अॅड. जळमकर यांनी केला. यात दोन्हीआरोपींना जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सोडल्यानंतर अमर त्याच्या दुचाकीने शिव कॉलनीत गेला. त्या ठिकाणी त्याने मयूर पाटील आणि खुशाल जावळे याला खून केल्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर धुळे येथे बहिणीकडे पळून जात असताना त्याने पुन्हा मयूरला फोन करून या खुनाबद्दल चर्चा करण्याची विनंती केली. दोघांमध्ये ४१ सेकंदाचे बोलणे झाले होते. त्यामुळे अमरचाही प्रत्यक्ष सहभाग असल्याचा युक्तिवाद अॅड. जळमकर यांनी केला. आरोपीतर्फे अॅड. सुशील अत्रे यांनी कामकाज पाहिले.