आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sub Tax Has Been Increased From This Year In Double

उपकर वाढल्याने घर बांधणे नागरिकांना पडतेय महागात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेच्या नगररचना विभागाकडे बांधकामाच्या मंजुरीसाठी विकास शुल्क तर भरावेच लागते. सोबत शासनाच्या तिजोरीत जाणाऱ्या उपकरात यंदापासून दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा थेट बोजा ग्राहकांवर पडतोय. गेल्या वर्षी १०२ रुपये प्रति चौरस मीटरवरून थेट २२० रुपये आकारणी केली जातेय. परिणामी महागाईच्या काळात सर्वसामान्यांना घर बांधणेही परवडत नसल्याची स्थिती आहे.
बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी बांधकाम खर्चाच्या एक टक्का उपकर वसूल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. २०१० पासून त्याची राज्यात अंमलबजावणीदेखील सुरू झाली. त्यानुसार महापालिका हद्दीत बांधकाम नकाशे मंजूर करताना एकूण बांधकाम खर्चाच्या एक टक्का उपकर कापून घेतला जातो. असंघटित कामगारांच्या कल्याणकारी योजनांसाठी बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांकडून उपकर वसुलीचे आदेश सरकारने दिले. बांधकाम खर्च १० लाखांच्या वर गेल्यास प्रत्येकाला उपकराचा भरणा बँक ऑफ इंडियात करून त्याची पावती मनपाकडे सादर करावी लागते.
भुर्दंड ग्राहकांनाच बसतो
रेडी रेकनरचे मूल्य वाढले म्हणजे व्हॅल्युएशन वाढते. त्या पाठोपाठ स्टॅम्प ड्यूटीतही वाढ होते. आता तर उपकरातही दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक ते पैसे बँकेत जमा करत असला तरी त्याची वसुली ही ग्राहकांकडूनच होते. खरा भुर्दंड हा ग्राहकांनाच बसतोय.
किशोर चोपडे, आर्किटेक्ट.
असंख्य घरे रिकामी
शहरातरो हाऊसेस तसेच अपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात फ्लॅट बांधून तयार आहेत. परंतु वाढलेले दर परवडणारा खर्च, यात महागाईचा आगडोंब त्यामुळे आता घरे खरेदीचा आलेख घसरत असल्याचे बांधकाम व्यवसायातील तज्ज्ञांनी सांगितले. पूर्वी बांधकाम खर्चा व्यतिरिक्त फारसा खर्च करावा लागत नव्हता. परंतु आता महापालिका क्षेत्रात मंजुरीसह, स्टॅम्प ड्यूटी, उपकर यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा मोजावा लागतोय. हा अतिरिक्त खर्च जास्तीचा झाल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणात घरे बांधूनही रिकामी पडली आहेत.

गेल्यावर्षी दर केले कमी

उपकराची रक्कम ही त्या वर्षाच्या रेडी रेकनरच्या आधारे निश्चित केली जाते. २०१४ मध्ये शासनाने मनपा क्षेत्रासाठी १७००० रुपये प्रति चौरस मीटर जाहीर केले होते. त्यामुळे एक टक्का उपकर प्रमाणे १७० रुपये आकारणी होणार होती. परंतु त्यानंतर लागलीच शासनाने परिपत्रक काढून जुन्याच दराने आकारणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे उपकराची १०२ रुपयांप्रमाणे आकारणी होत होती. परंतु यंदा २०१५ मध्ये रेडी रेकनरचे मूल्य २२ हजार रुपये जाहीर केले आहे. परिणामी थेट १०२ रुपयांवरून २२० रुपये उपकराची आकारणी केली जातेय.