आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदान खरे; मात्र, विद्यार्थी बनावट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - आदिवासी आणि अनुसूचित जातीच्या तरुणांनाही आधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने सुरू केलेल्या योजनांचा लाभ संबंधिताना होण्याऐवजी बनावट विद्यार्थी दाखवून अनुदान लाटण्याचे प्रकार वाढले आहेत. सोमवारी शहरात बनावट विद्यार्थ्यांमार्फत अशा अनुदानित अभ्यासक्रमाच्या उत्तर पत्रिका लिहून घेण्याचा गोरखधंदा उघडकीस आला.

शहरातील आदर्शनगर भागात असलेल्या ‘सनराइज अँनिमेशन अकादमी’च्या कार्यालयात एका अँनिमेशन कोर्सच्या परीक्षेवेळी उत्तरपत्रिका सामूहिकपणे लिहिल्या जात होत्या. ही माहिती मिळल्यावर ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने तिथे प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून भांडाफोड झाला. कोपर्‍यात असलेल्या या संस्थेच्या कार्यालयात राष्ट्रभाषा प्रचार समिती ज्ञान मंडल हे नाव असलेली काही पाकिटे पडलेली होती. त्यात उत्तरपत्रिका असल्याचे निर्देशित केले होते. जमिनीवर अंथरलेल्या एका सतरंजीवर बसून काही तरुण सामूहिकपणे उत्तरपत्रिका लिहित होते. काही कोर्‍या उत्तर पत्रिकाही (ज्यांच्यावर परीक्षार्थींची नावे, क्रमांक यापैकी काहीही लिहिलेले नाही) तिथे आढळून आल्या. ज्यावर 29 मे ही तारीख टाकून पर्यवेक्षकाने स्वाक्षरी केली होती.
संस्थेचे संचालक म्हणवून घेणार्‍या जितेंद्र चौधरी यांनी आधी ही परीक्षा अशीच होते, असे सांगत बनावाचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा बनाव उघड झाल्याने त्यांनी माघार घेतली. शिष्यवृत्ती देण्यासाठी थोडे ‘मॅनेज’ केले जाते, असे त्यांनी नमूद केले.

समाजकल्याण अनभिज्ञ- विशेष समाज कल्याण विभागातर्फे ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते, अशा विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणीचे काम संबंधित विभागाचे आहे. मात्र, या संस्थेच्या विद्यार्थ्यांची तपासणी झालेली नाही. समाजकल्याण अधिकारी व्ही.ए.पाटील यांच्याशी संपर्क केला असता, जर काही गैरप्रकार झाला असेल चौकशी करू, असे त्यांनी सांगितले.


आमिष देण्याचा प्रयत्न जे घडले त्याचे वृत्त प्रकाशित होऊ नये, यासाठी संबंधित वार्ताहराला आमिष देण्याचा प्रयत्नही चौधरी यांनी करून पाहिला. मात्र, दिव्य मराठीत बातमी मॅनेज होणार नाही, याची खात्री असल्यामुळे त्यांनी तो सारा प्रकार आवरून ठेवण्याचा प्रयत्न केला. फोटोग्राफरला पाहताच तिथल्या तरुणांनी चेहरे लपविण्याचा प्रयत्न केला आणि उत्तरपत्रिका सतरंजीखाली, फळीखाली लपवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.