आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Success Story Of Judge Raju Dole From Yawal, Jalgaon District

वडिलांच्या न्यायासाठी झाला वकील, आता जज!; राजू डोळे यांच्या चिकाटीची कहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल (जि.जळगाव)- फार्मसीची पदविका घेऊन १६ वर्षांपूर्वी नामांकित औषधी कंपनीत २० हजार रुपये पगाराची नोकरी करणारा तरुण वडिलांचे अपघाती निधन झाल्यानंतर न्यायालयीन लढ्यात पराभूत होतो. मात्र, मृत वडिलांना न्याय मिळवून द्यायचा, या इराद्याने पेटून उठत नोकरी सोडून वकील होण्यासाठी एलएलबी करतो. सनद मिळताच वडिलांची केस लढून न्याय मिळवतो. येथे ११ वर्षांच्या लढ्याचे श्रमसाफल्य होते. पण तो वंचितांना न्याय देता यावा यासाठी राज्य लोकसेवा आयोगाच्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सिव्हिल जज परीक्षेत उत्तीर्ण होऊन न्यायाधीशही बनतो. ही सिनेमाची कथा नव्हे तर जळगावच्या यावल येथील अ‍ॅड.राजू भास्कर डोळे यांचा थक्क करणारा जीवनप्रवास आहे.

अ‍ॅड. राजू यांचे वडील भास्कर डोळे आदिवासी विकास महामंडळात नोकरीला होते. १९९०मध्ये कामावरच त्यांचे नाशकात अपघाती निधन झाले. पुढे कुटुंबाची जबाबदारी पेलत १९९९ मध्ये फार्मसीची पदविका घेऊन राजू हे एका नामांकित कंपनीत २० हजार रुपये पगाराची नोकरी करत होते. मात्र, २००१-०२ मध्ये वडिलांच्या अपघात नुकसान भरपाईच्या केसचा निकाल त्यांच्याविरुद्ध गेला. वडिलांची बाजू ठामपणे मांडता न आल्याची खंत जाणवल्याने राजू यांनी मंुबई हायकोर्टात दाद मागितली. मात्र, नोकरी करताना तारखेनिमित्त मंुबईला ये-जा करणे, वकिलांशी चर्चा करताना तारखांदरम्यान अनेक मुद्दे मांडायचे राहिल्याची सल त्यांच्या डोक्यात घर करू लागली. यातूनच मृत वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वत:च कोर्टासमोर उभे राहावे, असा निर्णय घेत कुटुंबाच्या परवानगीनंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन २००४मध्ये एलएलबीला प्रवेश घेतला. २००७मध्ये एलएलबी उत्तीर्ण होऊन वकिलीची सनद मिळवली. यानंतर अॅड. डोळेंनी अंगावर काळा कोट चढवून स्वत: काेर्टात भक्कमपणे बाजू मांडली. सन २०११मध्ये केस जिंकून वडिलांना न्याय मिळवून दिला.
मात्र, वकिलीवरच न थांबता न्यायदानाकडे वळण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या जज परीक्षेत उत्तीर्ण होत त्यातही यश मिळवले.

पैसे कमावताना तत्त्वे जपावीत
अॅड. राजू डोळे यांनी २००४मध्ये नोकरी सोडून वेगळ्या शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल सुरू केली. मार्ग खडतर असला तरी वाटचालीत मी समाधानी आहे. कारण पैसे कमावण्यापेक्षा तत्त्वांची जपणूकही महत्त्वाची आहे, असे ते आवर्जून सांगतात.

व्यवस्थेने बनवले न्यायाधीश
२००८मध्ये एलएलएम आणि २०१०मध्ये नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या डोळेंनी सुरुवातीला प्राध्यापक व्हावे, असा विचार केला. काही संस्थांमध्ये नोकरीसाठी अर्जदेखील केला. मात्र, नोकरी मिळवण्यासाठी अलिखित व्यवस्थेचे अर्थकारण त्यांच्या तत्त्ववादी स्वभावाला रुजले नाही. यामुळे मनोधैर्य वाढून ते न्यायाधीश पदापर्यंत पोहोचले.