आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतात अचानक पडला बारा फुटांचा खोल खड्डा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरापासून जवळ असलेल्या धनूर या गावातील शेतात रात्रीतून पडलेला खड्डा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर हा खड्डा पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी होत आहे. प्रशासनाकडून मात्र अद्याप याची दखल घेतली गेली नसल्याची माहिती येथील गावकऱ्यांनी दिली. खड्डा निर्माण होण्यामागील कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

धनूरपासून तामसवाडी गावाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यालागत श्रीराम नागो चौधरी यांचे शेत आहे. त्यांनी शेतात सध्या कापूस लावला आहे. नेहमीप्रमाणे चौधरी कुटुंबीय शेतात गेले असताना पिकाच्या मधोमध पडलेला खड्डा त्यांना दिसला. सुमारे अडीच ते चार फूट व्यास असलेला हा खड्डा प्रत्यक्षात मात्र किती खोल आहे, हे मात्र कळू शकत नाही; परंतु आतमध्ये धसलेल्या मातीला पाहता त्याची खोली किमान १० ते १२ फुटांपर्यंत असल्याचे जाणवते. दरम्यान, माती धसल्यामुळे त्याची रुंदी सायंकाळी वाढल्याचे स्थानिक गावकऱ्यांनी सांगितले; परंतु हा खड्डा नेमका कशामुळे पडला हे सांगणे कठीण आहे. खड्डा असलेल्या या भागात पूर्वी कोणतीही विहीर अथवा पाण्याचा स्रोत नव्हता. एवढी खात्रीलायक माहिती गावकरी देतात. असे असताना खड्डा कसा निर्माण झाला हा प्रश्न आहे. दरम्यान, या खबरदारीचा उपाय म्हणून चौधरी कुटुंबीय सध्या तरी कोणत्याही गावकऱ्याला जवळ जाऊ देत नाही. या घटनेबद्दल गावात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवाय त्यांना कपोलकल्पित गोष्टींचा आधार दिला जात आहे. असे असताना प्रशासनातील अधिकारी तर दूर पण साधा कोणताही कर्मचारी चौधरी यांच्या शेताजवळ फिरकलेला नाही. त्यामुळे घटनेमागील नेमके भूगर्भीय कारण काय हे अद्याप तरी समोर आलेले नाही.