आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोसाकाच्या २१व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोपडा - खान्देशात अनेक साखर कारखाने बंद पडत असून, काही बंद झाले आहेत. असे असतानाही चोपडा सहकारी साखर कारखाना मात्र आर्थिक अडचणीतही तग धरून उभा आहे. चोसाका यापुढेही चालूच राहील. कारण ‘चोसाका’मागे चोपडा तालुक्याची सुख-शांती लपली असल्याचे मत संत बालयोगी महाराज यांनी मंगळवारी २१व्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी व्यक्त केले.

कारखान्यात मंगळवारी सकाळी १0 वाजता विधिवत पूजा गव्हाणीत उसाची मोळी टाकून संत बालयोगी महाराजांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. ऊस वजनकाट्याचे पूजन आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर माजी आमदार दिलीप सोनवणे, कैलास पाटील, संत मायबाप महाराज, संत रासबिहारी दास, चेअरमन डॉ.सुरेश पाटील, व्हाइस चेअरमन चंद्रहास गुजराथी, डॉ.सुशीलाबेन शहा, गिरीश पाटील, डोंगर पाटील, माजी महापौर किशोर पाटील, कारखान्याचे संचालक आदी उपस्थित होते.

दुसऱ्या कारखान्यांएवढा भाव देणार : चेअरमन डॉ.पाटील यांनी आपल्या प्रास्तविकात जागतिक बाजारात साखरेचे भाव पडल्याने देशातील साखर धोरणाची स्थिती बिकट झाली आहे. जिल्हा बँकेने वित्तपुरवठा बंद केला त्या वेळी कारखाना बंद पडेल, असे वाटत होते. मात्र, तेव्हा शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे कारखाना तग धरू शकला. पूर्ण क्षमतेने चालत नसल्यानेच कारखाना तोट्यात आहे. बुलडाणा अर्बन बँकेने कर्ज दिल्यामुळे या वर्षी कारखान्याची मशिनरी चांगली तयार झाली आहे. मशिनरीमुळे कारखाना चालू राहील ३१ मार्चअखेर यंदाचा हंगाम संपेल. तसेच कोणत्याही कारखान्याने अद्याप पहिल्या उचलसाठी भाव जाहीर केला नाही. असे असले तरी दुसरे कारखाने जो भाव देतील तेवढा भाव चोसाका देईल, असे डॉ.पाटील यांनी संचालकांच्या वतीने जाहीर केले.