आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तो’ क्षण टळल्यास आत्महत्या अशक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - गेल्या काही वर्षांत जळगाव शहरात अंगावर शहारे आणणार्‍या आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये तसा विचार मनात आल्यानंतर आत्महत्या करण्याच्या कालावधीतील ‘तो’ क्षण किंवा वेळ अन्य कोणत्याही कारणाने टाळता आल्यास दुर्घटना टळू शकते, असे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

काही वर्षांपूर्वी दोघा मुलांसह पत्नीलाठार मारून तरुणाने स्वत: आत्महत्या केल्याची घटना गणेश कॉलनीत घडली होती. नंतर प्रेमनगरात अशीच घटना घडली होती. या घटनेत एकाला वाचवण्यात यश आले होते. अशा घटना केव्हा, कोणत्या परिस्थितीत घडतात आणि त्या कशा रोखल्या जाऊ शकतात, यासंदर्भात मानसोपचारतज्ज्ञांशी केलेली चर्चा..

लताच्या सासूला अटक
लता व नेहा गवळी या मायलेकीच्या मृत्यूप्रकरणी सासूविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर सासूला अटक करून न्यायालयात हजर केले असता, तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. मृत लताचा भाऊ गणेश यादव याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात लताची सासू शोभाबाई राजू गवळी ही लग्न झाल्यापासून 50 हजार रुपयांसाठी तिचा छळ करत होती. या त्रासाला कंटाळून लताने आत्महत्या केली असल्याचे गणेश यादवने नमूद केले आहे.

मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात..
बर्‍याचदा मानसिक आजारांतून अशा घटना घडतात. प्रसूतीनंतरही महिला डिप्रेशनमध्ये जातात. हे प्रमाण 10 टक्क्यांपर्यंत असते. या घटना घडण्यापूर्वी बरेच जण घरातील सदस्यांजवळ तसे बोलून दाखवतात; मात्र नेमके त्याकडे दुर्लक्ष होते व घटना घडते. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये ती व्यक्ती तसे करेल, हे गृहीत धरून दक्षता घेणे गरजेचे असते.
डॉ.सतीश पाटील, मानसोपचारतज्ज्ञ

मानसिक आजारामुळेही आत्महत्येच्या घटना घडत असतात. एखादा क्षण असा येतो की, ती व्यक्ती आत्महत्येचा निर्णय घेते. ‘तो’ क्षण टळला तर घटनाही टळू शकते. त्यासाठी असा विचार मनात बाळगणार्‍या व्यक्तीला कोणीतरी रस्त्यात भेटले व बराच वेळ चर्चा चालली, तर त्याच्या मनातील आत्महत्येचा विचार निघून जातो. संतापात होणार्‍या घटना वेगळ्या असतात. डॉ.एस.जी.बडगुजर

व्यक्तीचा स्वभाव व मानसिक आजार ही दोन आत्महत्येची कारणे असू शकतात. घरगुती भांडण टोकाला गेल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. डिप्रेशनमधून अशा घटना नेहमीच घडत असतात. समुपदेशनातून वाद मिटवता येतो; मात्र त्यासाठी चर्चा होणे गरजेचे आहे. रागही नियंत्रणात आणता येऊ शकतो. तसेच मानसिक आजारावर औषधे देऊनही उपचार करता येतो.
डॉ.दिलीप महाजन