आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी ‘आधार स्पर्श’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - तालुक्यातीलवेल्हाळे येथील आदी जनता शिक्षण प्रसारक मंडळाने राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी ‘आधार स्पर्श’ निवासी वसतिगृह सुरू केले आहे. या वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी मोफत निवासासह शिक्षण आणि भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील १८ मुलांची वसतिगृह प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. ३० जुलैपर्यंत या वसतिगृहात मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

जिल्ह्यात जानेवारी २०१० ते १४ एप्रिल २०१५दरम्यान तब्बल ४९१ शेतकऱ्यांनी, कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. मात्र, राज्यात हा आकडा अधिक आहे. घरातील कर्ता माणूस गेल्यावर मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न उभा ठाकतो. त्यामुळे वेल्हाळे येथील आदी जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष सोनवणे यांनी आधार स्पर्श या नावाने, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी निवासी वसतिगृह सुरू केले आहे. या वसतिगृहाच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या शिक्षणासह, विद्यार्थ्यांचा निवास आणि भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. आदी जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे वेल्हाळे येथे माध्यमिक विद्यालय आहे. याच विद्यालयाच्या आवारात वसतिगृहाची उभारणी केली जात आहे.

सध्या दोन खोल्यांचे काम पूर्ण झाले आहे. प्रवेश घेणाऱ्या मुलांना प्रसारक मंडळाच्या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत प्रवेश दिला जाईल. तर इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण वेल्हाळे येथील जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण करवून घेतले जाणार आहे. पहिलीपासून इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना, मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश दिला जाईल. यानुषंगाने नियाेजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात पहिल्यांदाच उपक्रम
संस्थेनेयंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्रजी माध्यमही सुरू केले आहे. यातही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना प्रवेश दिला जाईल. यासाठी येणाऱ्या सर्व खर्चाची जबाबदारी आदी जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष सोनवणे यांनी घेतली आहे. यासह समाजातील काही दानशूर मंडळींचेही सहकार्य यासाठी लाभणार आहे. जिल्ह्यात अशाप्रकारचा उपक्रम प्रथमच राबवला जात आहे.

१८ मुलांची झाली नोंदणी
‘आधारस्पर्श’ वसतिगृहात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८ मुलांची नोंदणी करण्यात आली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी ३० जुलैपर्यंत प्रवेशाची मुदत आहे. यात राज्यभरातील किमान ५० मुले प्रवेश घेतील, असा अंदाज आहे. विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट किंवा तिपटीने वाढली, तरी हा उपक्रम सुरू ठेवण्याची तयारी संस्थेने दाखवली आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची अवहेलना थांबवण्यासाठी हा प्रयत्न आहे. पुढील वर्षापासून मुलींसाठीही वसतिगृह सुरू केले जाणार आहे. यंदा पहिलेच वर्ष असल्याने दोन खोल्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. आगामी दोन वर्षांत भव्य वास्तू उभी राहील. यासाठी शासनाकडून अनुदानाची मागणी केलेली नाही. दानशुरांची मदत आणि पदरमोड करून यापुढील काळातही हे कार्य, अशाप्रकारेच सुरू ठेवणार आहोत. संतोषसोनवणे, अध्यक्ष, आदी जनता शिक्षण प्रसारक मंडळ
बातम्या आणखी आहेत...