आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात नागरिकांची ‘सुलभ’ लूट; शौचालय ठेकेदाराकडून कराराचा भंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- उत्पन्नवाढीसाठी जळगावकरांवर करवाढीचा बोजा टाकणार्‍या पालिकेला आपल्या कर्तव्याचा विसर पडला आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी पालिकेच्या जागांवर उभारण्यात आलेली सुलभ शौचालयांची देखभाल दुरुस्ती करणे पालिकेला जड जात असल्याने ही सुविधा मक्तेदारांच्या भरवशावर सोडण्यात आली आहे. सुलभ शौचालय चालकांवर नियंत्रणाची जबाबदारी आमची नसल्याचे महापालिका आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मक्तेदारांकडून नियम धाब्यावर बसवत नागरिकांची लूट सुरू आहे.
सर्वाधिक वर्दळ असलेल्या फुले मार्केट परिसरात पालिकेतर्फे सुलभ शौचालयासाठी बांधण्यात आलेल्या जागेत अतिक्रमण करून दुकाने बांधण्यात आली आहेत. त्यामुळे सन 2009 मध्ये सोलापूर येथील मधुर सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेला बीओटी तत्त्वावर फुले मार्केटमध्ये सुलभ शौचालय बांधण्यास परवानगी देण्यात आली होती. या ठिकाणी नागरिकांना शौचालयासाठी 5 रुपये तर मुतारीसाठी महिला व पुरुषांकडून 1 रुपया वसूल करण्यात येत आहे.
आरोग्य विभागातर्फे वेळोवेळी संबंधित मक्तेदाराकडून नियमांचे पालन होत आहे किंवा नाही, याची तपासणी करणे अपेक्षित आहे. मात्र, आरोग्य विभागाने बांधकाम विभागाकडे बोट दाखवले आहे तर बांधकाम विभाग म्हणते ही आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. नियंत्रण कुणाचे हेच स्पष्ट नसल्याने सुलभ शौचालय चालकांचे दर निश्चितीसह सुविधांची तपासणीच होत नसल्याची स्थिती आहे. अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने मक्तेदारांकडून सुविधा देण्याच्या नावाखाली नागरिकांची लूट सुरू आहे.
>मधुर संस्थेशी झालेल्या करारातील प्रमुख अटी-शर्ती
>नागरिकांकडून शौचालयासाठी 2 रुपये, अंघोळीसाठी 5 रुपये प्रति व्यक्ती शुल्क राहील. मुतारीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
>शौचालयाच्या बांधकाम तसेच देखभाल दुरुस्तीसाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती संस्थेला स्वखर्चाने करावी लागेल.
>पालिकेने पे अँण्ड युज तत्त्वावर शौचालय बांधण्याची परवानगी दिल्यानंतर व जागा उपलब्ध करून दिल्यावर प्रत्येक ठिकाणचे काम 1 वर्षाच्या आत पूर्ण करून द्यावे. अन्यथा प्रति दिवस 100 रुपये दंड आकारण्यात येईल.
>बांधकाम पूर्ण झाल्यावर शहर अभियंत्यांकडून पूर्णत्वाचा दाखला घेतल्याशिवाय पुढील काम अथवा नागरिकांसाठी त्याचा वापर करू नये.
पूर्णत्वाचा दाखला न घेता वापर
शहरातील 6 ठिकाणी पे अँण्ड युज तत्त्वावर शौचालय उभारण्याची तयारी सोलापूरच्या मधुर सेवाभावी संस्थेने दर्शवली होती. यासाठी फुले, गोलाणी मार्केटच्या अग्निशमन कार्यालयाजवळ, श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाच्या कोपर्‍यालगत, महात्मा गांधी उद्यान बसथांब्याजवळ, तहसील कार्यालय व जुने बसस्थानक या ठिकाणांची निवड केली होती. पालिकेतर्फे सर्व ठिकाणी बांधकाम करण्याचे नकाशे व करार प्रक्रिया करण्यात आले होते. मात्र, संस्थेने फुले मार्केटनंतर इतर ठिकाणची कामे केली नाही. नियमानुसार वर्षभरात कामे न केल्यास प्रतिदिवस 100 रुपये दंड आकारण्याचे करारात नमूद आहे. फुले मार्केटमधील बांधकाम केल्यावर तीन वर्षे उलटूनही कामाच्या पूर्णत्वाचा दाखला न घेताच व्यावसायिक वापर सुरू झाला आहे.
इतर ठिकाणीही लूट सुरूच
पालिकेच्या महात्मा गांधी मार्केटच्या पश्चिमेस सुलभ शौचालय आहे. याठिकाणी शौचालयासाठी 5 रुपये घेतले जातात. हीच स्थिती नवीन व जुने भिकमचंद जैन मार्केट, गोलाणी मार्केट या ठिकाणीही मक्तेदारांकडून 5 रुपये वसुली केली जाते. संबंधित मक्तेदारांना अधिकृत मक्ते दिले आहेत काय? दिले असल्यास अटी-शर्तींचे पालन होत आहे काय? या बाबींची तपासणी करण्याकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे.
कराराबाबत मी अनभिज्ञ
शहरातील सुलभ शौचालय देताना महापालिका प्रशासनासोबत त्यांचा काय करार झाला आहे, यासंदर्भात मला काहीच माहीत नाही. बांधकाम परवानगी, हस्तांतरणसंदर्भातील जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत नागरिकांकडून शौचालय वापरासाठी वसूल केले जाणारे दर किंवा इतर बाबींची तपासणी करण्याचा प्रश्नच येत नाही.
-विकास पाटील, आरोग्य अधिकारी