आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उन्हाच्या तडाख्याने पडली होती कोकिळा वखारीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - उन्हाचा तडाखा माणसांप्रमाणे पक्ष्यांनाही बसत आहे. जबरदस्त झळ बसून कोकिळा घायाळ होऊन शनिवारी सकाळी खाली पडली. ही कोकिळा वखार मालक गायकवाड यांना दिसताच त्यांनी ‘दिव्य मराठी’च्या छायाचित्रकाराशी संपर्क साधला. यानंतर पक्षितज्ज्ञ विनोद भागवत यांच्या मार्गदर्शनानुसार समीर वैद्य, सुयोग आळंदे यांनी धावपळ करून कोकिळेवर तातडीने उपचार केले आणि तिला जीवदान दिले.
शनिवारी सकाळी कोकिळा जमिनीवर पडल्यानंतर तिला पक्षितज्ज्ञांच्या हवाली करण्यात आले. कोकिळेची पाहणी केल्यानंतर, उन्हामुळे तीव्र झटका बसल्याचे लक्षात आले. त्यानंतर चाळीसगाव येथील पशुवैद्यक डॉ. दीपक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार या कोकिळेला पंखातून इंजेक्शन देण्यात आले. मरणासन्न अवस्थेत असलेली कोकिळा उपचारामुळे थोडी तग धरू लागली आहे. ही कोकिळा साधारणपणे साडेनऊ वर्षे वयाची असल्याची माहिती सर्पविहार संस्थेचे समीर वैद्य यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
ही कोकिळा पहाडी भागात राहत असून भारतात ती सर्व ठिकाणी आढळते. दरम्यान या कोकिळेच्या पंखात असलेल्या कोरड्या नसेतून इंजेक्शन देण्यात आले. मानवाप्रमाणे पशु-पक्ष्यांनाही उष्माघाताचा झटका बसतो. अशा स्थितीत ते वाचण्याचे प्रमाण कमी असते; परंतु योग्य उपचार मिळाल्याने ही कोकिळा वाचण्यास मदत झाली. या घटनेमुळे पशु-पक्ष्यांच्या आरोग्याची समस्या समोर आली आहे. ‘दिव्य मराठी’ने यापूर्वीच पशु-पक्ष्यांसाठी आपल्या दारात पाणी ठेवण्याचे तसेच धान्य टाकण्याचे आवाहन करून अभियान राबविले आहे.