आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Summer News In Marathi, Health, Temperature, Divya Marathi

उन्हाचा प्रतिकार करण्यास व्हा सज्ज!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - प्रत्येक ऋतुबदलाचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे आपल्या आहार-विहाराकडे विशेष लक्ष दिल्यास असह्य उन्हाळादेखील सुसह्य होऊ शकेल, असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे. शहरातील तापमानाने 38 अंशांपर्यंत मजल मारल्याने उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. आतापासूनच काळजी घेतल्यास उष्माघातासह अन्य आजारांवर मात करणे शक्य होणार आहे. जळगावकरांनी उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी सज्ज व्हावे.
उन्हाळा सुरू होताच प्रकृतीच्या अनेक तक्रारी सुरू होतात. मात्र, यंदा अर्धा मार्च उलटला तरी अद्याप तापमानाने चाळिशी गाठलेली नाही. पण तापमान चाळिशीच्या जवळ येऊन ठेवले आहे. महिनाभरापासून नागरिक तिन्ही ऋतू अनुभवत आहेत. मार्चच्या शेवटी उन्हाची तीव्रता जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे हीट जळगावकरांना जाणवणार आहे. आतापासूनच आहार आणि विहाराची काळजी घ्यायला हवी. उन्हामुळे भूक मंदावते आणि शरीराकडून पाण्याची अधिक प्रमाणात मागणी केली जाते. त्यानुसार आहारात बदल करायला हवा. शहरात गॉगल्स, टोपी आणि पांढरे रूमाल विक्रेेत्यांबरोबरच थंडपेय विक्रेत्यांचीही दुकाने लागली आहेत. तथापि, घरांमध्ये गारवा राहावा यासाठी ग्रीन शेडनेट बसविणे, कुलरची दुरुस्ती ही कामे सुरू झाली आहेत.


हे आजार होऊ शकतात
सातत्याने उन्हात काम केल्यानंतर उष्माघात होतो. वृद्ध, लहान मुले आणि उच्च रक्तदाब, हृदयविकार असलेल्या माणसांना याचा सर्वाधिक त्रास होतो. थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, मळमळ होणे, स्मृतिभ्रंश, अस्वस्थता, घामोळ्या होणे, डोकेदुखी, गजकर्ण यासारख्या व्याधी, आजार होतात. त्यामुळे शक्यतो उन्हात जाणे टाळावे किंवा उन्हात फिरताना सफेद कपड्यांचा वापर करावा.


काय खाऊ नये?
जास्त तेलकट-तुपकट आणि तिखट पदार्थ खाणे आरोग्यास हानीकारक.
रस्त्यावर दिसणारे फालुदा, आइसक्रीम, विविध रंगांचे ज्यूस टाळावे
खूप चिल्ड पाणी अथवा पदार्थ टाळावे
वडा, समोसा, चिप्स, भजी, फरसाण हे पदार्थ टाळता येतील तेवढे टाळावे
खाऊन लगेच घराबाहेर पडू नये
मटण, अंडी, मासे, चिकन आदींचे सेवन कमी प्रमाणात करण्यात यावे.
उन्हाळ्यात याकडे द्या लक्ष
रोज व्यायामासाठी वेळ द्यायला हवा.
बाहेर निघताना सनस्क्रीन लोशन लावा. स्कार्प, समर कोट, टोपीचा वापर करा.
कॉटनचे हलके शक्यतो पांढर्‍या रंगाचे कपडे वापरण्याची आवश्यकता.
डोळ्यांसाठी क्वालिटीचे सन ग्लासेस वापरावे.
घराबाहेर पडताना सोबत ग्लुकोज आणि लिंबू पाणी सोबत असू द्यावे
दुपारी उन्हात जाणे टाळावे. उन्हातून आल्यावर लागलीच एसीमध्ये जाऊ नये.

काय खावे?
प्रामुख्याने पाण्याचा अधिक अंतर्भाव असलेल्या फळांचे भरपूर प्रमाणात सेवन करावे.
जेवणात दोन्हीवेळ काकडी, टोमॅटो, गाजर यांचं सॅलाड व ताक अवश्य घ्यावे.
ग्लुकॉन डी व पाणी भरपूर प्यावे
कुठल्याही ज्यूसपेक्षा लिंबू सरबत, नारळपाणी आणि ताक पिणे अतिउत्तम
घरी केलेली लस्सी, ताक, पन्हं आठवड्यातून आलटून पालटून घ्यावे
ज्वारीची भाकरी, मुगाची खिचडी, भात खावा.


घरगुती उपाय करा
उन्हाळ्यात हातापायांची आग, ओठ-घसा कोरडे पडतात. यावर एक लिटर पाण्यात सुके अंजीर, मूठभर मनुका आणि दोन चमचे धणे घालून हे मिर्शण रात्रभर माठात ठेवावे. सकाळी रव्हीने घुसळून गाळून पुन्हा माठात ठेवावे. दिवसभर हे पाणी थोडे थोडे करून प्यावे.
द्राक्षांच्या रसात चिमूटभर जिरेपूड आणि चिमूटभर बडीशोप पूड टाकून प्याल्यास उष्णतेमुळे क्षीण झालेला रसधातू पुन्हा टवटवीत होतो.
उन्हाळ्यात लहान मुलांना घामोळ्या आल्यास त्यावर खरबुजाचा गर लावावा.
लघवी करताना आग होणे, लघवीचा रंग गडद होणे ही लक्षणे दिसल्यास कपभर दुधात अर्धा चमचा चंदनाचे गंध, चवीनुसार खडीसाखर मिसळून घेतल्यास फरक पडतो.


लहान मुलांना द्यावे गुलकंद
उन्हाळ्यात आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. डोक्याकडील भागाकडून शरीर तापते. त्यामुळे उन्हात जाताना शक्यतो डोके आणि तोंडाला रुमाल बांधला पाहिजे. लहान मुलांना गुलकंद द्यावा तर वयोवृद्धांना घराबाहेर पडू न देता शक्यतो कुलरच्या सान्निध्यात आराम करू द्यावा. आयुर्वेदिक थंड पदार्थांवर भर दिल्यास शरीराचे तापमान स्थिर राहते. बाहेरील थंडपेयाने तेवढय़ापुरते बरे वाटते; पण विषाणुसंसर्ग होण्याची शक्यता असते. -डॉ. कल्पेश पटेल, आयुर्वेदाचार्य.शहरातील तापमानाने 37 अंशांपर्यंत मारली मजल; नागरिक हैराण