आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

61 वर्षांपासूनचा सारंगी वादनाचा अखंड प्रवास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - खरं तर त्यांचं ‘मुरलीधर’ऐवजी सारंगीधर असं नाव हवं होतं. वयाच्या 83 व्या वर्षीही त्यांचे सारंगी, सरोद वादनातले सूर अजूनही तरुण आहेत. वाद्यवादनातील 61 वर्षांपासूनच्या प्रवासात त्यांनी आकाशवाणीसह विविध धार्मिक कार्यक्रमांनाही सूरमयी केले आहे. खान्देशातील एकमेव सारंगी आणि सरोदवादक म्हणून लौकिक असलेले जळगाव येथील मुरलीधर खानोरे (भावसार) यांच्याशी संवाद साधला असता, सूरमयी प्रवासाचा पट उलगडत गेला आणि 45 वर्षांपासून जतन केलेल्या वाद्यातून त्यांचे संगीतप्रेमही.

खानोरेंचा वादनाचा प्रवास आजही सुरळीत सुरू आहे. वाजवण्यास अत्यंत कठीण असणारे सारंगी वादन आणि यासाठी त्यांनी केलेली कष्टप्रद साधना थक्क करणारी आहे. 1952 पासून ते सारंगी आणि सरोदवादन करीत आहेत.

सवाई गंधर्वांपासून घेतले धडे
खानोरे 1936 ते 1942 पर्यंत मुंबईत होते. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. त्या वेळी पराळकर नावाचे त्यांचे शेजारी होते. तर सवाई गंधर्व पराळकरांचे मित्र होते. कार्यक्रमानिमित्त महिनाभर सवाई गंधर्वांचा मुक्काम पराळकरांकडे असायचा. रोज सकाळी त्यांचा रियाज सुरू झाला की, खानोरे तेथे जाऊन बसायचे. यातून त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. गंधर्वांसोबतच त्यांनी संगीताचे धडे घेतले. तेव्हापासून संगीतासोबत त्यांची तार जुळली ती अद्याप कायम आहे.

नारळाच्या करवंटीचा प्रयोग
घरची परिस्थिती बेताची असल्याने वाद्य खरेदी करणे शक्यच नव्हते. यासाठी नारळाच्या करवंटीलाच तार लावून सराव सुरू केला. रेडिओवरील गाण्यांच्या आधारे सूर लावण्याचा प्रयत्न केला आणि सुरांशी मैत्री झाली.

60 रुपयांत सारंगी!
खानोरे यांनी नातेवाइकांकडील जुनी सारंगी घेत ती दुरुस्त केली. त्यानंतर 1968 मध्ये हैदराबादला एका दुकानात रेडिओ स्टेशनची खराब झालेली सारंगी 60 रुपयांत खरेदी केली. आज 45 वर्षांपूर्वीची ही सारंगी त्यांनी अद्याप जतन करून ठेवली आहे. सरोदलाही 20 वर्षे झाली आहेत. महाराष्ट्रात त्यांनी अनेक उस्ताद, पंडितांसोबत सारंगी वादन केले असल्याचे ते गौरवाने सांगतात.