आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Superstition In Dead Body Room In Jalgaon District

शवविच्छेदनगृहात मृतदेह जिवंत करण्याचा अघोरी प्रयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पाचोरा तालुक्यातील मोंढाळे येथे राहणारे मुकुंदा गोविंदा साळुंखे यांचा गुरुवारी (२ ऑक्टोबर) सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यानंतर साळुंखे यांचा मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवलेला असताना त्यांना पुन्हा जिवंत करण्याचा अघोरी प्रयोग पाचोरा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन मांत्रिकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
साळुंखे यांना साप चावल्यामुळे त्यांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले जात होते. शिरसोलीजवळ रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी माघारी फिरून पुन्हा पाचोरा ग्रामीण रुग्णालय गाठले. याठिकाणी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार होते. दरम्यान बाळू जगन्नाथ मोरे (वय ४०, रा.शिवापूर,चाळीसगाव) बापू बाबुलाल शिंदे (वय ५०, रा.खडकी, चाळीसगाव) हे दोघे मांत्रिक शवविच्छेदन गृहात दाखल झाले. त्यांनी साळुंखे यांना जिवंत करतो, असा दावा केला. मात्र त्यांचे मंत्रोच्चार सुरू असतानाच पोलिसांनी हा प्रकार रोखला. पोलिस कॉन्स्टेबल पांडुरंग गोडबंजारा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरोधात जादूटोणाविरोधी कायदा २०१३चे अंतर्गत कलम प्रमाणे पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे

मंत्रोच्चाराद्वारे प्रयत्न
साळुंखेयांचा मृतदेह जिवंत केल्याचा दावा केल्यानंतर मोरे याने हातात लिंबाचा पाला घेऊन तो मृतदेहाच्या डोक्यावर, चेहऱ्यावरून फिरवला. काही मिनिटे हीच क्रिया सुरू होती. त्या वेळी मोरे आणि शिंदे दोघेही तोंडातून काहीतरी मंत्र पुटपुटत होते. त्यांच्या या भोंदुगिरीमुळे मृतदेह जिवंत झाला नाही. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करीत ही भोंदुगिरी रोखली अन् दोघा भामट्यांना ताब्यात घेतले.

मांत्रिक नव्हे, मृताचा मेव्हणा
मृतमुकुंदा साळुंखे हा शिंदे यांचा शालक होता. शालकाचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून शिंदे एसटी बसने पाचोऱ्याला आला होता. त्याला बसस्थानकावर बाळू मोरे भेटला. मोरेच्या दुचाकीने दोघे पाचोरा ग्रामीण रुग्णालयात गेले. दोघांचीही पार्श्वभूमी मांत्रिकाची नाही, दोघेही शेतकरी आहेत. मात्र, देवावर प्रचंड श्रद्धा असल्यामुळे आपण मंत्रोच्चाराचा प्रकार करून बघितला, असे दोघांनी पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी दोघांच्या घरी जाऊनही तपास केला असता, दोघेही मांत्रिक नसल्याचीच माहिती पोलिसांना मिळाली, असे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश आंधळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.