आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Surat To Nagpur National Highway No. 6 On Accident Issue

सात महिन्यात महामार्गाने घेतले 15 बळी; चौपदरीकरणासाठी मुद्दाम होतेय टाळाटाळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- राष्ट्रीय महामार्गाची सध्याची अवस्था ‘आई जेवू घालीना अन् बाप भीक मागू देईना’, अशी झाली आहे. चौपदरीकरणासाठी महामार्ग एप्रिल 2013 मध्ये ‘नॅशनल हायवे अँथॉरिटी’कडे वर्ग करण्यात आला. यानंतर सार्वजनिक बांधकामच्या अंतर्गत येणार्‍या महामार्ग विभागाची जबाबदारी संपली. महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ‘नही’कडे आली. मात्र, चौपदरीकरण होईल असे मधाचे बोट लावून त्यांनी यंदा पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. यामुळे सुरू झालेली अपघातांची मालिका सात महिन्यात तब्बल 15 बळी घेतल्यावरही कायम आहे. सोमवारी दाम्पत्य ठार झाल्याने याचा पुन्हा प्रत्यय आला.
उजलेकर बंधूंचा बळी
10 मे रोजी राख वाहतूक करणार्‍या वाहनाने दुचाकीला उडवले. सकाळी 11 वाजता झालेल्या अपघातात वरणगाव येथील सुरेश उजलेकर (वय 55) आणि राजू उजलेकर (वय 46) या दोघा भावांचा जागीच मृत्यू झाला. वरणगावकडून येताना भुसावळ शहरात प्रवेश करणार्‍या वळणाच्या रस्त्यावर हा अपघात झाला होता.

उपाययोजना शून्यच
महामार्गावरील वाहतुकीचा सर्वाधिक धोका भुसावळ शहराला आहे. नाहाटा चौफुलीला लागून शाळा-महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ असते. मात्र, झेब्रा क्रॉसिंगचा अभाव आहे. सिग्नलही बंद असतात. रेल्वे उड्डाणपुलाजवळ दोन्ही बाजूने संरक्षण कठडे नाहीसे झाले आहेत. हॉटेल सुहास, वरणगाव नाका येथे गतिरोधक हवेत. दिशादर्शक फलक गरजेचे आहेत.

हे आहेत डेंजर झोन
भुसावळ तालुक्यातून 24 किलोमीटर अंतराचा राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. साकेगावमधील बसस्थानक, फॉर्मसी कॉलेजजवळील वळण. पुढे रेल्वे उड्डाणपूल, नाहाटा चौफुली ते साकरी फाटादरम्यानचा महामार्ग, हिरा मारोती मंदिर परिसर, वरणगाव बसस्थानक, बोहर्डी फाटा ही राष्ट्रीय महामार्गावरील ठिकाणे सर्वाधिक अपघात होणारी स्थळे आहेत.

किमान दिलासा हवाच
चौपदरीकरण होणार असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने हायवेकडे दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यापूर्वी होणारी साइडपट्टय़ांची दुरूस्ती यंदा झाली नाही. यामुळे अवजड वाहने रस्त्यावरून खाली उतरवल्यास अपघाताच धोका वाढला आहे. गतिरोधकांचाही अभाव आहे.

चौपदरीकरण रखडले
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. गेल्यावर्षी या कामाला सुरूवात होणे अपेक्षित होते. मात्र, दुष्काळी स्थितीमुळे अडचणी आल्या. चौपदरीकरण झाल्यास महामार्ग रुंद होईल. वाहनांची कोंडी कमी झाल्याने अपघातही कमी होतील. मात्र, काम कधी सुरू होईल, हे अनिश्चित आहे.

आठवड्यात पाच बळी
दीपनगर ते फुलगावदरम्यान हिरा मारोती मंदिराजवळ आठ दिवसात तब्बल पाच बळी गेले. 30 जूनला ओम्नी झाडावर आदळून स्वप्निल बाळासाहेब चौधरी (वय 22, रा.वरणगाव) याचा मृत्यू झाला. तर चौधरी कुटुबातील सहा जण गंभीर जखमी झाले. यापैकी दोघांवर पुणे येथे उपचार सुरू आहेत. यानंतर 5 जुलैच्या रात्री ट्रकखाली चेंदामेंदा होऊन रिक्षामधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. अमोल गोसावी (वय 21), सुमन सुतार (वय 35), योगेश पाटील (वय 22) आणि अजय माळी (वय 22, सर्व रा.भुसावळ) अशी मृतांची नावे आहेत. यापूर्वी महामार्गावर सर्वाधिक अपघात याच परिसरात झालेले आहेत.

खडका चौफुली ते साकरी फाटा अपघाती क्षेत्र
खडका चौफुली ते साकरी फाटादरम्यानचा भाग अपघाती क्षेत्र बनला आहे. 30 जानेवारीला ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर देठे (वय 27), विकास विचवेकर (वय 28, जामनेर) या दोघांचा मृत्यू झाला. यानंतर 3 एप्रिलला अज्ञात वाहनाच्या धडकेत गोकूळ पंडित पारधी (वय 45, रा.धानोरा बुद्रूक, ता.जळगाव) यांचा बळी गेला. तर गेल्या महिन्यात 15 जूनला ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील शालिनी नारायण पाटील (वय 43, रा.हतनूर) यांचा जागीच मृत्यू झाला. एकाच परिसरात चौघांचा बळी गेला.

रेल्वे उड्डाणपुलावर बुलडाण्याच्या दोघांचा मृत्यू
8 मे 2013 रोजी दुपारी दीड वाजता रेल्वे उड्डाणपुलाजवळ कंटेनरने टाटा सुमोला उडवले. सुमो पुलावरून खाली घसरली. अपघातामध्ये आठ जण जखमी झाले. यापैकी शेख अकबर शेख वजी मांडेवाला (वय 28), सय्यद आरिफ सय्यद युसुफ (वय 28) या दोघांचा मृत्यू झाला. यापूर्वी सुद्धा रेल्वे उड्डाणपुलाजवळ अनेक अपघात झालेले आहेत. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे कधीच तुटल्याने अपघातांना आयते आमंत्रण मिळते.

पती-पत्नी ठार
साकेगावजवळ फॉर्मसी कॉलेजच्या वळणावर 8 जुलैला सकाळी अपघात झाला. ट्रकच्या धडकेत ऐनपूर (ता.जळगाव) येथील रहिवासी राजाराम जैतकर (वय 54), नलू जैतकर (वय 45) महामार्गावर खाली पडले. ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने दोघांचा मृत्यू झाला. जानेवारी 2013 पासून ते 8 जुलैपर्यंत या अपघातामुळे बळींची संख्या 15 झाली. या वेगवेगळ्या अपघातांमध्ये 15 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले.