आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हसमुख बोरोले झाले दु:खी, उदास; दाढीही वाढलीय!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - एरवी नेहमी सुटाबुटात, क्लीन शेव्ह आणि हसतमुख राहणारे तापी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले पोलीस कोठडीतील मुक्कामाला चांगलेच वैतागले आहेत. त्यांना एकेक दिवस ढकलणे कठीण झालेय. वैतागून ते दाढीही करीत नसल्याने त्यांचा अवतार पार गबाळा झालाय. फरार बोरोलेंना पोलिसांनी ठाण्याहून अटक केल्यानंतर 30 मे रोजी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली. ती मुदत संपत असल्याने बुधवारी त्यांना मुख्य न्याय दंडाधिकारी एम.व्ही. देशपांडे यांच्या न्यायालयात हजर केले गेले. तासभराच्या युक्तिवादानंतर सात दिवसांची कोठडीची मागणी फेटाळून न्यायालयाने पाच दिवस कोठडी सुनावली. आता 11 जून रोजी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पोलिसांनी तीन महिने चौकशी का केली नाही? -आरोपीचे वकील सुशील अत्रे यांनी पुन्हा पोलिस कोठडीची आवश्यकता असल्याचे कोणतेही मुद्दे पोलिसांकडे नसल्याचे सांगितले. यापूर्वीच सात दिवसांची कोठडी असताना पोलिसांना तपासाची संधी होती. शिवाय आरोपी बोरोले यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तेव्हा 24 जानेवारी 2011 ते 14 मे 2011 पर्यंत पोलिसात बोरोले यांनी हजेरी लावली होती. सुमारे 3 महिने बोरोले पोलिसांना उपलब्ध असताना त्यांनी चौकशी का केली नाही? असा प्रश्न बचावपक्षाने उपस्थित केला होता.
पोलिसांनी चोपडा येथील तापी पतपेढी, बँक ऑफ इंडिया, देना बॅँक व चोपडा अर्बन बॅँकेत जाऊन सुरेश बोरोले व नातेवाईक हेमलता बोरोले, पंकज बोरोले, चारुशीला बोरोले, पंडित बोरोले, जयवंता बोरोले यांचे बॅँकेतील खाते उतारे प्राप्त केले आहेत.
मालमत्तांचा शोध - पंकज बोरोले, चारुशीला बोरोले व बोरोलेंचा भाचा गोकूळ भोळे यांच्या खात्यातून सुरेश बोरोलेंच्या नावे त्यांच्या खात्यात रकमा जमा झाल्या आहेत का? याची खातरजमा तसेच बोरोलेंच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कोठडी मागितली.
तपासाधिकार्‍यांचा वकिलांवर आरोप - आरोपीला भेटण्यासाठी वकिलांना परवानगी द्यावी, यासाठी अर्ज देण्यात आला होता. त्यावर तपासाधिकार्‍यांनी दिलेल्या खुलाशात जर वकिलांना भेटू दिले तर ते आरोपीला उलटसुलट सल्ला देतील व पुरावा नष्ट होईल, असे नमूद केले आहे. याबाबत अँड. अत्रे यांनी तीव्र आक्षेप घेतला. कलम 41 (ड) या नुसार आरोपीला अटकेनंतर वकिलाला हजर ठेवण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.
रायसोनींच्या जामिनावर 12 जून रोजी सुनावणी - घरकुलप्रकरणात अटकेत असलेले प्रदीप रायसोनींचे वकील हजर राहू न शकल्याने जामीन अर्जावरील सुनावणी 12 जून रोजी होणार आहे. नगरपालिकेच्या घरकुलयोजनेत सर्वात अगोदर अटक झालेले व सध्या कारागृहात असलेले प्रदीप रायसोनी यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर बुधवारी न्यायाधीश व्ही.एस. दीक्षित यांच्या न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु रायसोनी यांच्यातर्फे बाजू मांडण्यासाठी नागपूर येथून येणारे सीनियर कौन्सिल शशांक मनोहर हे येऊ शकले नाहीत. त्यामुळे अँड. सुशील अत्रे यांनी सुनावणीसाठी पुढील तारीख देण्याची विनंती केली. आता 12 जून रोजी सुनावणी होणार आहे.