आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन, देवकर यांची आज कोर्टात हजेरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरकुल घोटाळ्यातील आरोपी आमदार सुरेश जैन, पालकमंत्री गुलाबराव देवकरांसह सर्व आजी-माजी नगरसेवकांना न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या आहेत. त्यानुसार न्यायालयाने आरोपींना नोटीसदेखील बजावल्या असल्याने गुरुवारच्या सुनावणीवेळी सर्वच जण हजर राहणार आहेत.

घरकुल घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बरेच दिवस जळगाव न्यायालयात जामीन अर्ज व इतर अर्जांवरही कामकाज झाले. मात्र, कोणत्याही तारखेला किंवा सुनावणीला सर्व आरोपी न्यायालयात कधीही उपस्थित राहिले नाहीत. आरोपींनी न्यायालयात उपस्थित रहावे व तसेच न्यायालयाने त्यांना आदेश करावेत अशी विनंती विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयाकडे केली होती. या अर्जाची दखल घेऊन न्यायाधीश व्ही.एस.दीक्षित यांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपींसह इतर सर्व आरोपींना 24 रोजी न्यायालयात सुनावणीकामी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तपासाधिकारी पंढरीनाथ पवार यांच्यामार्फत सर्व आरोपींना तशा नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. आमदार सुरेश जैन रुग्णालयात दाखल झाल्यापासून तब्बल 10 महिन्यांनंतर गुरुवारी न्यायालयात उपस्थित राहणार का? याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता लागून आहे.

कागदपत्रांचे अवलोकन
आयबीपी योजना मंजूर झाल्याच्या प्रस्तावासह मंजूर कर्जाच्या व्यवहारांची संपूर्ण कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली. या सर्व कागदपत्रांचा पंचनामाही करण्यात आला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांचे अवलोकन सुरू आहे. अवलोकनाचे काम पूर्ण झाल्यानंतर पोलिस कागदपत्रातून तपासाचे मुद्दे काढणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष तपास व जाबजबाबांना सुरुवात होईल.

जिल्हा बँकेतील कागदपत्रे पोलिसांनी घेतली ताब्यात
जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी आमदार सुरेश जैन असताना बँकेत आयबीपी योजना राबविण्यात आली होती. यात घोटाळा झाल्याची तक्रार नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी दिल्यावरून गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे नोंदविण्यात आले मात्र, तपास थंडावला होता. या कागदपत्रांवर धूळ जमा झाली होती. आता पोलिसांनी ती झटकली आहे. तपासाधिकारी पंढरीनाथ पवार यांच्या आदेशावरून जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बी.डी.पावरा यांनी बुधवारी जिल्हा बँकेत जाऊन या गुन्ह्यांशी संबंधित सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.