आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश जैन ‘बॅरेक नंबर 6’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- तब्बल 1 वर्ष 7 महिने 14 दिवसांनंतर जळगावचे आमदार सुरेश जैन अखेर जळगावात दाखल झाले. अद्ययावत रुग्णवाहिकेतून मंगळवारी पहाटे 4 वाजून 39 मिनिटांनी त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच कैदी म्हणून तुरुंगात पाऊल ठेवले. प्रदीप रायसोनी यांच्या जवळच्या बॅरेक क्रमांक 6 मध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे.

सुरेश जैन यांची प्रकृती बरी असल्यामुळे त्यांना आता जळगावला हलवण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज त्यांच्या वतीने जळगाव न्यायालयात करण्यात आला असून त्यावरील युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. येत्या 12 नोव्हेंबर रोजी त्यावर निर्णय होणार होता. त्यापूर्वीच जैन यांना जळगावला आणले जात असल्याचे वृत्त सोमवारी जळगावात धडकले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्यांना नेमके जळगावलाच आणले जाते आहे का? याबाबतही प्रo्न उपस्थित केले जात होते. रात्री उशिरापर्यंत जळगाव कारागृहात यासंदर्भात अधिकृत काहीही कळविण्यात आलेले नसल्यामुळे प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.

सोमवारी सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास अद्ययावत रुग्णवाहिकेत (एमएच 04 ईएल 9926) बसून त्यांनी सेंट जॉर्जेस रुग्णालय सोडले. त्यांच्या मागोमाग त्यांची खासगी कारही (एमएच 19 एवाय 1919) होती. त्यात सौ.रत्ना जैन यांच्यासह नातलग बसले होते. रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी या रुग्णवाहिकेने नाशिकमध्ये प्रवेश केला तर पहाटे 3 वाजता त्यांनी जळगाव जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला. 4 मिनिटांनी रुग्णवाहिका कारागृहाबाहेर पोहोचली. 4 वाजून 38 मिनिटांनी रुग्णवाहिकेतून आमदार जैन उतरले. 22 मार्च 2012 रोजी जळगाव सोडल्यानंतर ते पहिल्यांदाच जळगावच्या मातीत पाय ठेवत होते.

जिल्हा रुग्णालयात पलंग तयार : जैन यांना जळगावला आणले जाते आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एक पलंग तयार करण्यात आला. एक व्हीआयपी दाखल होण्याची शक्यता आहे, एवढेच रुग्णालय प्रशासनाला सांगण्यात आले असले तरी कोण दाखल होईल, याची कल्पना सगळय़ांनाच आली होती. मात्र, रुग्णवाहिकेत डॉ. खालीद यांनी त्यांची तपासणी केली आणि नंतर त्यांना कारागृहातच ठेवण्याचा निर्णय झाला. रुग्णवाहिका दाखल झाल्यानंतर कारागृह अधीक्षक डी.टी.डाबेराव तिथे दाखल झाले. तुरुंगाच्या रजिस्टरमध्ये 4 वाजून 44 मिनिटांनी जैन यांना दाखल करून घेतल्याची नोंद करण्यात आली आहे.

गंभीर आणि शांत : पांढरा शुभ्र कुर्ता, पायजामा, कमरेला वैद्यकीय पट्टा आणि अंगावर शॉल ओढलेल्या अवस्थेत जैन रुग्णवाहिकेतून खाली उतरले. कोणाच्याही चेहर्‍याकडे न पाहाता जमिनीकडे डोळे करून ते पुढे सरकत होते. माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांच्या लगबगीतून 15 सेकंदात त्यांनी कारागृ़हात प्रवेश केला. आत गेल्याबरोबर शरीराला आलेली मरगळ आळस देऊन झटकली.

अटकेपासून (10 मार्च 2012) ते कारागृह प्रवेशापर्यंतचा घटनाक्रम

10 मार्च 2012 रात्री 11.33 मिनिटांनी जैन यांना इंदूर येथे जात असताना धरणगाव रेल्वे स्थानकाजवळ अटक.

11 मार्च 2012 न्यायालयात येण्यास विरोध, 10 दिवसांची पोलिस कोठडी अमळनेर पोलिस ठाण्यात हलविले, तपासाधिकारी इशू सिंधू यांनी लाच मागितल्याचा जैन यांनी केला आरोप.

15 मार्च 2012 सेनेचा जळगावात पुन्हा मोर्चा.

19 मार्च 2012 जैन यांची पोलिस कोठडी संपली, अमळनेरातच सुनावणी, न्यायालयीन कोठडीत केली रवानगी.

19 मार्च 2012 सायंकाळी 6 वाजेनंतर नाशिक कारागृहात हलविण्याची तयारी सुरू असतानाच जैन यांची तब्येत बिघडली, अमळनेरात कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ, रात्री 12 वाजेच्या सुमारास जळगाव सिव्हिल हॉस्पिटलला हलवले, तत्कालीन सिव्हिल सर्जन डॉ.एन.जी. राठोड यांना मारहाण. रात्री 1 वाजेच्या सुमारास गणपती हॉस्पिटलमध्ये दाखल.

22 मार्च 2012 विशेष विमानाने जैन यांना मुंबई येथे ब्रिच कॅण्डी हॉस्पिटलला हलविले. तात्पुरता जामिनासाठी अर्ज.

25 मार्च 2012 जैन यांच्यावर ब्रिच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया.

22 मार्च 2012 जैन यांना तात्पुरता जामीन मंजूर.

23 एप्रिल 2012 जैन यांना ब्रिच कॅण्डी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, सेंट जॉर्ज येथे हलविले.

2 जुलै 2012 जैन यांचा तात्पुरता जामिनाचा अर्ज फेटाळला.

5 जुलै 2012 ला जैन स्वत: जसलोक हॉस्पिटलला दाखल.

30 जुलै 2012 नियमित जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला.

13 सप्टेंबर 2012 औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज फेटाळला.

6 ऑक्टोबर 2012 रोजी जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

18 ऑक्टोबर 2012 सर्वोच्च् न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

3 नोव्हेंबर 2012 रोजी आर्थररोडमध्ये रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी गेले. अवघ्या 15 मिनिटांनी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल.

17 डिसेंबर 2012 औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळला.

13 फेब्रुवारी 2013 सर्वोच्च् न्यायालयाने जामीन फेटाळला.

6 मे 2013 रोजी सर्वोच्च् न्यायालयाने जामीन फेटाळला.

7 जून 2013 रोजी सर्वोच्च् न्यायालयाने जामीन फेटाळला.

9 जुलै 2013 रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला.

29 सप्टेंबर 2013 रोजी औरंगाबाद खंडपीठाने जामीन फेटाळला.

7 ऑक्टोबर 2013 रोजी सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळला.

4 नोव्हेंबर 2013 सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधून रात्री 7.30 वाजता डिस्चार्ज. जळगावला रवाना.

5 नोव्हेंबर 2013 पहाटे 4 वाजून 04 मिनिटांनी जळगाव कारागृहाजवळ आगमन. पहाटे 4 वाजून 39 मिनिटांनी कारागृहात दाखल.